लोकसत्ता प्रतिनिधी

बदलापूर : बदलापूर शहरातील पूर्वेत असलेल्या एका नामांकीत शाळेत अवघ्या तीन वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पालकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी शाळा आणि पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास मोठा वेळ घेतल्याने पालकांत संतापाचे वातावरण आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. मात्र या प्रकारानंतर शाळेतील पालककांच्या मनात भितीचे वातावरण आहे.

बदलापूर पूर्वेतील एक नामांकीत शैक्षणिक संस्थेत हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. शाळेतील छोट्या शिशु वर्गात शिकणाऱ्या तीन वर्षाच्या दोन मुलींसोबत हा प्रसंग घडला. एका मुलीने आपल्या पाल्यांना शाळेतील दादा नावाने परिचीत असलेल्या एका व्यक्तीने आपल्या गुप्तांगाला हात लावल्याची माहिती दिली. त्यानंतर पालकांनी त्या मुलीच्या वर्गातील दुसऱ्या मुलीच्या पालकांना याबाबत कळवले. त्यांना संशय आल्याने त्यांनी आपल्या मुलीला बदलापूर पूर्वेतील एका रूग्णालयात तपासणीसाठी नेले.

आणखी वाचा-मुंबईचा जैविक कचरा अंबरनाथमध्ये? जांभिवलीच्या औद्योगिक वसाहतीत भूखंड देण्याच्या हालचाली

या तपासणीनंतर रूग्णालयाने त्यांना अत्याचार झाल्याबाबत दुजोरा दिला. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबत तक्रार दिली. मात्र बदलापूर पूर्व पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात मोठा वेळ घेतल्याचा आरोप पालकांनी केला आहे. अखेर याप्रकरणी १६ ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या सुमारास अनोळखी इसमाविरूद्ध गुन्हा दाखल केला. भारतीय न्याय संहिता आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये संतापाचे आणि भीतीचे वातावरण आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी अंबरनाथचे सहायक पोलीस आयुक्त सुरेश वरडे यांना संपर्क केला असता, आरोपीला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. आरोपी हा शाळेतीलच सफाई कर्मचारी असल्याचेही वरडे यांनी सांगितले आहे.