डोंबिवली – अंगारकी चतुर्थीनिमित्त टिटवाळा येथील श्री सिध्दीविनायक मंदिर आणि डोंबिवलीतील महागणपतीच्या दर्शनासाठी मंगळवारी भाविकांनी अलोट गर्दी केली. टिटवाळा येथे पहाटे चार वाजल्यापासून श्री सिध्दीविनायकाचे दर्शन भाविकांसाठी खुले करण्यात आले होते.

लाखो भाविक टिटवाळ्यात सिध्दीविनायकाच्या दर्शनासाठी दाखल झाले होते. २१ वर्षानंतर श्रावण महिन्यात अंगारकी चतुर्थीचा योग आला आहे. त्यामुळे या अंगारकीला विशेष महत्व आहे. श्रावण महिन्यातील उपवास आणि त्यात अंगारकी चतुर्थी आल्याने ही पर्वणी आहे असा विचार करून राज्याच्या विविध भागातील भाविक टिटवाळ्यात सिध्दीविनायकाच्या दर्शनासाठी दाखल झाले. अतिशय शिस्तबध्द पध्दतीने रांगेतून भाविकांना दर्शनासाठी सोडले जात होते.

श्री सिध्दीविनायक मंदिर व्यवस्थापन समितीने भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून तीनशे स्वयंसेवकांचा ताफा मंदिर परिसरात, दर्शन रांगेप्रमाणे तैनात केला आहे. याशिवाय टिटवाळा पोलीस या भागात गस्त ठेऊन आहेत. मंदिर परिसरात भाविकांच्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून मंदिर परिसरातील वाहनतळ बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांना मंदिर परिसरात खुलेपणाने फिरता येत होते.

वाहनाने येणाऱ्या भाविकांना मंदिरापासून दूर अंतरावरील मोकळ्या जागा, वाहनतळ, रस्त्याच्या कड़ेला वाहने उभी करण्याच्या सूचना यापूर्वीच मंदिर व्यस्थापनाने दिल्या आहेत. सुमारे सव्वा लाखाहून अधिक भाविक दर्शनासाठी टिटवाळ्यात दाखल झाले आहेत. वाढत्या भाविकांच्या संख्येमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी पोलिसांकडून घेतली जात आहे. गर्भगृहात भाविकांना समाधाने दर्शन मिळेल अशी व्यवस्था केली होती. उन, पावसाचा खेळ सुरू असल्याने भाविक समाधान व्यक्त करत होते.

टिटवाळा रेल्वे स्थानक ते श्री सिध्दीविनायक मंदिर परिसरात वाहतुकीला अडथळा होणार नाही. कोणीही फेरीवाला रस्ता अडवून बसणार नाही यासाठी पालिकेच्या अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील या भागात नजर ठेऊन होते. संकष्टी, अंगारकी चतुर्थी असली की टिटवाळा रेल्वे स्थानक भागात फेरीवाल्यांची गर्दी असते. पण पालिकेचे फेरीवाला हटाव पथकाचे कर्मचारी या भागात तैनात असल्याने फेरीवाले गायब होते.

डोंबिवलीत श्री गणेश मंदिरात पहाटे पाच वाजल्यापासून भाविकांनी महागणपतीचे दर्शन घेण्यास सुरूवात केली. मंदिरात भाविकांना रांगेतून दर्शन घेता यावे असे नियोजन करण्यात आल्याने भाविकांना समाधानाने दर्शन घेता आले. वृध्द, ज्येष्ठ मंडळी दर्शन रांगेतून गणपतीचे दर्शन घेत होते. मंदिर व्यवस्थापनाने भाविकांची गैरसोय होणार नाही असे नियोजन केले होते.