कल्याण – टिटवाळ्यामध्ये एका तरुणाने समाज माध्यमातून एका २३ वर्षाच्या तरुणीशी मैत्री केली. तिचा विश्वास संपादन करून तिच्याकडून विविध कारणे सांगून सोन्याचे दागिने ताब्यात घेतले. हे दागिने तरुणी परत मागायला लागली. तेव्हा तो तरुणीला ब्लॅकमेल करू लागला. अखेर या तरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीने दृश्यध्वनी चित्रणाच्या माध्यमातून तरुणाला संपर्क करून आपल्या राहता घराच्या गच्चीवर जाऊन जीवन संपवले.

टिटवाळा पोलीस ठाण्यात मयत तरुणीच्या कुटुंबियांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. काही घडले नसताना अचानक मुलीने आत्महत्या केल्याने कुटुंबीय हादरले. गोवेली येथील शासकीय रुग्णालयात तरुणीला नेण्यात आले. पण तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या मुलीचा मोबाईल तपासल्या नंतर तिचा संपर्क ऋतिक रोहणे या तरुणांवर होता असे निष्पन्न झाले. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली.

टिटवाळा पोलीस तात्काळ तपास चक्र हलवून ऋतिकला ताब्यात घेतले. या प्रकरणातील ऋतिक रोहणेने अशा प्रकारे अनेक मुलींना फसवले आहे, असा आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी केला. त्यांच्या मुलीसोबत जे घडले, ते इतर कोणासोबत घडू नये, यासाठी त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी मयत मुलीच्या कुटुंबीयांनी केली आहे. ऋतिकने अशा पद्धतीनं किती मुलींची फसवणुक केली आहे याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

मुलीवर अंत्यसंस्कार केल्या नंतर नातेवाईकांनी तरुणीचा मोबाईल तपासला. त्यावेळी मुलीच्या आत्महत्येचे खरे कारण पुढे आले. मयत तरुणीचा ऋतिक रोहणे या तरुणा बरोबर संपर्क होता. तिच्याशी त्याने इंस्टाग्रामवर ओळख करून मैत्री केली होती. तरुणीचा विश्वास संपादन करून ऋतिक याने नंतर वेगवेगळी कारणे सांगून तरुणी जवळील सोन्याचे दागिने घेतले होते. काही दिवसानंतर पीडित तरुणी तिचे दागिने परत मागत होती. पण, ऋतिक ते दागिने परत करण्यास नकार देत होता. तसेच तिला ब्लॅमेकल करत होता. तसेच तरुणीचा त्याच्यासोबत असलेला दृकश्राव मुद्रणातील फोटो समाज माध्यमांमध्ये प्रसारित करण्याची धमकी देत होता. या दुहेरी कोंडी मध्ये तरुणी सापडली होती. हा विषय ती कोणाला बोलूही शकत नव्हती.

ऋतिककडे सतत दागिने मागूनही तो ते परत करत नाही. तसेच आपली त्याच्या ताब्यात असलेली प्रतिमा प्रसारित करण्याची तो धमकी देत आहे. यामुळे तरुणी खूप अस्वस्थ झाली होती. सर्व प्रकारच्या विनंत्या मागण्या करूनही ऋतिक आपल्याला दात देत नाही म्हणून तरुणीने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.

आत्महत्येपूर्वी तिने ऋतिकला दृकश्राव्य ध्वनी चित्रणातून संपर्क केला होता. आणि याच संपर्क दरम्यान पीडित तरुणीने आपल्या राहत्या घराच्या गच्चीवर जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी ऋतिक रोहणेला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.