आपण श्रीमंत आहोत, आपल्याकडे विविध प्रकारच्या दुचाकी आहेत असे मुलींना दाखवून त्यांना आकर्षित करायचे. त्यांना दुचाकीवर घेऊन मौजमजा करत फिरायचे. नंतर दुचाकी विकून मजा करायची अशी सवय जडलेल्या टिटवाळ्यात फुलांचे हार विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका तरूणाला महात्मा फुले पोलिसांनी दुचाकी चोरीच्या गु्न्ह्यात अटक केली आहे. त्याच्याकडून तीन चोरीच्या मोटार सायकल पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.
माधव नामदेव भामरे (२०, रा. निंबोली, खडवली, ता. कल्याण) या तरूणाला पोलिसांनी अटक केली आहे. डोंबिवली, कल्याण परिसरात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्याने पोलिसांनी या चोऱ्या शोधण्यासाठी स्वतंत्र पथके तयार केली आहेत. महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांना गुप्त बातमीदारातर्फे टिटवाळा जवळील गोवेली गाव येथे एक तरूण चोरीच्या दुचाकी विकण्यासाठी येणार आहे, अशी माहिती मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, साहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास ढोले, हवालदार मनोहर चित्ते, पी. के. निकाळे, आनंद कांगरे, संदीप भोईर, जितेंद्र चौधरी, सतिश सोनावणे यांनी गोवेली गाव परिसरात सापळा लावला.
गोवेली नाक्यावर एक तरूण संशयास्पदरित्या फिरत होता. सापळा लावून बसलेल्या साध्या वेशातील पोलिसाने त्याला हटकले. त्याने उत्तर दिले नाही. पोलिसांना संशय आल्याने त्याला ताब्यात घेतले. त्याने आपण चोरीच्या दुचाकी विकण्यासाठी येथे आल्याची माहिती पोलिसांना दिली. आपणास हवा असलेला दुचाकी चोर हाच याची खात्री पटल्यावर शोध पथकाने त्याला महात्मा फुले पोलीस ठाण्यात आणले. त्याने आपण टिटवाळा गणेश मंदिर येथे हार विक्रीचा व्यवसाय करतो. आपणास मुलींना आकर्षित करून त्यांना घेऊन फिरण्याची हौस आहे. ही हौस पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे आपण दुचाकी चोरून आपली हौस पूर्ण करत होतो, अशी कबुली पोलिसांना दिली, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी दिली.
आरोपी माधव भामरे याने ठाणेनगर, शिवाजीनगर, कल्याण परिसरातून तीन मोटार सायकल चोरल्या आहेत. एक लाख १० हजार रूपये किमतीच्या दुचाकी त्याने दाखविलेल्या ठिकाणाहून जप्त केल्या आहेत. माधवने आणखी काही अशाप्रकारे चोऱ्या केल्या आहेत का याचा तपास सुरू आहे, असे पाटील यांनी सांगितले.