कल्याण – टिटवाळ्यातील बेकायदा बांधकामे, फेरीवाले यांच्यावर कारवाईचा बडगा सुरू असतानाच, कल्याण डोंबिवली पालिकेच्या अ प्रभागाने टिटवाळा पोलिसांच्या साहाय्याने शहरात नशामुक्त अभियान मोहीम मंगळवारपासून सुरू केली या मोहिमेंतर्गत शाळांच्या परिसरात पान टपऱ्या चालवून त्या माध्यमातून प्रतिबंधित गुटखा सदृश्य सुगंधित वस्तू विक्री करणाऱ्या पान टपरी चालकांच्या टपऱ्या पालिका आणि पोलिसांनी बंद केल्या.
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील अनेक पान टपरी चालक नियमितच्या पान विक्री बरोबर प्रतिबंधित गुटखा सदृश्य वस्तू विक्री करत असल्याचे पोलिसांनी वेळोवेळी शहराच्या विविध भागात घातलेल्या छाप्यांवरून उघड केले आहे. बहुतांशी तरूण पीढी अलीकडे प्रतिबंधित गृटखा, गांजा सेवनाकडे वळत आहे.
डोंबिवलीत अलीकडेच एका शाळेतील विद्यार्थी शाळेत गांजा आणि ई सिगारेटची हाताळणी करत असल्याचे निष्पन्न झाले होते. अनेक गांजा तस्कर आपण पोलिसांच्या तावडीत सापडू नये म्हणून शाळकरी विद्यार्थी, त्यांचे दप्तर यांचा गांजा वहनासाठी वापर करतात. असे प्रकार यापूर्वी घडले आहेत. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी मागील वर्षापासून शहरात नशामुक्त अभियाना चालवून गांजा तस्कर, अंमली पदार्थ तस्कर यांचे अड्डे मोडून काढले आहेत.
शाळांच्या परिसरात पान टपऱ्या असू नयेत असा शासनाचा नियम आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचारी, अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी मंगळवारी सकाळपासून संयुक्तपणे टिटवाळ्यातील निमकर नाका ते टिटवाळा रेल्वे स्थानकां दरम्यान विशेष मोहीम राबवून शाळांच्या परिसरातील पान टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
या पान टपऱ्यांच्या माध्यमातून तंबाखू, गुटखा विक्री केली जात असल्याचा पोलिसांना संशय आहे. शाळांच्या परिसरात पान टपऱ्या असल्याने विद्यार्थ्यांचा वावर याठिकाणी राहतो. काही गांजा, अंमली पदार्थ विक्री करणारे तस्कर अलीकडे शाळांच्या परिसरात सापळा लावून विद्यार्थ्यांना पैशाचे आमिष दाखवतात आणि गांजाचे वहन करण्यास भाग पाडतात. हे प्रकार टाळण्यासाठी टिटवाळ्यात शाळांच्या परिसरात असलेल्या पान टपऱ्यांवर पालिका आणि पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमुळे पालक, शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे.
बांधकामांवर कारवाई
टिटवाळ्यात स्वामी समर्थ मठाच्या बाजुला नारायण एज्युकेशन ट्रस्टच्या आवारात चार बेकायदा गाळे बांधले आहेत, अशी तक्रार साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांना प्राप्त झाली होती. या बेकायदा गाळ्यांची खात्री पटल्यावर हे गाळे मंगळवारी अ प्रभागाच्या तोडकाम पथकाने जमीनदोस्त केले. याशिवाय रेल्वे स्थानक भागातील फेरीवाले, निमकर नाका ते रेल्वे स्थानक भागात चोरूनलपून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर पालिकच्या फेरीवाला हटाव पथकाने कारवाई केली.