मंदिर आठ तास दर्शनासाठी खुले
कल्याण – २१ वर्षानंतर अंगारकी चतुर्थी आणि श्रावण महिना हा योग मंगळवार, १२ ऑगस्ट रोजी जुळुन आला आहे. या योगानिमित्त टिटवाळा येथील प्रसिध्द श्री सिध्दीविनायक मंदिरात भाविक लाखोच्या संख्येने येण्याची शक्यता विचारात घेऊन श्री सिध्दीविनायक मंदिर ट्रस्टने भाविकांना रांगेतून श्रध्देने दर्शन घेता यावे म्हणून सुसज्ज व्यवस्था केली आहे, अशी माहिती टिटवाळा येथील श्री सिध्दीविनायक मंदिर ट्रस्टचे विश्वस्त सुभाष जोशी यांनी दिली.
मध्य रेल्वेच्या मुंंबई ते कसारा रेल्वे मार्गावरील ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा येथील श्री सिध्दीविनायक मंदिर भाविकांचे श्रध्दास्थान आहे. महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातून भाविक याठिकाणी दर्शनासाठी येतात. दररोज सुमारे पंचवीस ते तीस हजार भाविक, संकष्टी चुतर्थी असेल त्या काळात सुमारे लाखभर भाविक दर्शनासाठी येतात. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी भाविकांची ही संख्या सुमारे सव्वा लाख ते दीड लाखापर्यंत जाते. हा अनुभव विचारात घेऊन श्री सिध्दीविनायक मंदिर ट्रस्टने मंदिर परिसरात भाविकांना सरळमार्गी दर्शन घेता यावे म्हणून सुसज्ज नियोजन केले आहे.
८ ऑगस्ट २००५ रोजी श्रावण महिन्यात अंगारकी चतुर्थीचा योग आला होता. श्रावण मास, चातुर्मास अशा उपवासाच्या महिन्यात हा योग आला आहे. श्री सिध्दीविनायक मंदिर परिसरात तलावालगत निवारा असलेला कायमस्वरुपी दर्शन मंडप आहे. पाऊस असला तरी भाविकांना सुस्थितीतपणे या निवाऱ्याखाली उभे राहण्याची सोय आहे. मंदिरा बाहेरील भागात कोणीही भाविकाने दर्शनासाठी मध्ये घुसू नये म्हणून मंदिराच्या पोहच मार्गावरील प्रवेश मार्गापासून रस्ता रोधक लावण्यात आले आहेत. टिटवाळा रेल्वे स्थानक किंवा रस्ते मार्गाने मोटारीने आलेला भाविक थेट मंदिराकडे न येता तो दर्शन रांगेत उभा राहील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
मंदिरालगतचे वाहनतळ भाविकांच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या जागेत रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन, अत्यावश्यक सेवेची वाहने, पोलीस वाहनांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भाविकांनी मंदिरापासून दूर अंतरावरील वाहनतळ, रस्ते मार्गाच्या कडेला वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा पध्दतीने वाहने उभी करावीत, असे आवाहन मंदिर ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
टिटवाळा पोलीस ठाण्याचे ५० पोलीस, अनिरूध्द बापू आपत्कालीन व्यवस्थापन समितीचे ३०० स्वयंसेवक याठिकाणी तैनात असणार आहेत. भाविकांना रांगेत उभे करणे, पाणी देणे, एखाद्या भाविकाला शारीरिक काही त्रास होत असेल तर त्याला तात्काळ वैद्यकीय मदतीसाठी साहाय्य करणे ही कामे यावेळी स्वयंसेवकांकडून करण्यात येणार आहेत.
पहाटेपासून मंदिर खुले
मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान श्री सिध्दीविनायकावर अभिषेक, आरती आणि इतर धार्मिक विधी पार पडल्यानंतर पहाटे चार वाजता मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान आरती होईल. त्यानंतर चंद्रोदयापूर्वी रात्री ९.१३ पूर्वी आरती होईल. मंगळवारी रात्री १२ वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी भाविकांना खुले राहणार आहे, असे मंदिर विश्वस्त सुभाष जोशी यांनी सांगितले.