डोंबिवली – डोंबिवलीत वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या टिटवाळा येथील एका मध्यस्थ महिलेला ठाणे येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने कौशल्याने डोंबिवली पूर्वेतील टाटा लेनजवळील एका हाॅटेलमधून व्यवहार करताना अटक केली. या महिलेने वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या चार तरूणींची या महिलेच्या तावडीतून पथकाने सुटका केली. अटक केलेली महिला टिटवाळा येथील रहिवासी आहे.

सुनीता संजय चव्हाण असे अटक करण्यात आलेल्या मध्यस्थ महिलेचे नाव आहे. ती मूळची जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहे. डोंबिवलीत एक महिला ग्राहकांकडून दहा हजार रूपये घेऊन काही तरूण मुलींना वेश्या व्यवसायात ओढत आहे, अशी गुप्त माहिती ठाणे येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गोराडे यांना मिळाली.

या महिलेचे ग्राहक, तरूणी संपर्काचे मोबाईल क्रमांक वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरडे यांना मिळाले होते. या महिलेला अटक करण्यासाठी पोलीस पथकाने एक बनावट ग्राहक उभे करून मध्यस्थ महिला सुनीता चव्हाण यांना संपर्क करण्यास सांगितले. बनावट ग्राहकाने शरीर सुखासाठी तरूणींची मागणी मध्यस्थ महिलेकडे केली. तरूणींची प्रतिमा तुम्ही पसंत करा. ती तरूणी तुम्हाला १० हजार रूपये आपल्याकडे जमा केल्यावर मिळेल. त्या तरूणीला घेऊन तुम्ही लाॅजवर जा, असे मध्यस्थ महिला सुनीता चव्हाण यांनी पोलीस पथकाने उभे केलेल्या बनावट ग्राहकाला सांगितले. सुनीता नावाची महिला डोंबिवलीत वेश्या व्यवसाय करते याची खात्री पथकाला पटली.

मध्यस्थ महिलेने दिलेल्या ठिकाण आणि वेळेप्रमाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने डोंंबिवली पूर्वेतील टिळक रस्त्यालगतच्या टाटा लाईनखालील एका हाॅटेल परिसरात सापळा लावला. त्या हाॅटेलमध्ये सुनीता चव्हाण, चार पीडित तरूणींना घेऊन येणार होती. पोलीस पथकाने ठरल्या वेळेत बनावट ग्राहक मध्यस्थ महिला सुनीता चव्हाण यांना भेटण्यासाठी पाठविले. मध्यस्थ महिलेने चार तरूणी बनावट ग्राहकाला दाखविण्याचे, दहा हजार रूपये घेतल्याचे व्यवहार पूर्ण केले.

त्यानंतर बनावट ग्राहकाने पोलीस पथकाला मोबाईलवर मिसकाॅल देऊन इशारा केला. तात्काळ वरिष्ठ निरीक्षक गोरडे पथकासह हाॅटेलमध्ये दाखल झाल्या. त्यांनी सुनीता चव्हाणसह पीडित तरूणींना घेरले. आपण गुन्हे शाखेचे पोलीस असल्याची ओळख पथकाने मध्यस्थ महिलेला दिली. आपण पोलीस जाळ्यात अडकल्याचे समजताच मध्यस्थ महिलेसह चार पीडित तरूणींची गडबड उडाली.

हाॅटेलमध्ये आलेले इतर ग्राहक घडला प्रकार पाहून गडबडले. हाॅटेलमधील भोजनासाठी आलेल्या इतर ग्राहकांना त्रास नको म्हणून पोलीस पथकाने रामनगर पोलीस ठाण्यात येऊन संगीता चव्हाण यांच्यासह इतर महिलांची चौकशी केली. त्यावेळी आपल्या पतीचे निधन झाले आपले शिक्षण नाही. उपजीविकेसाठी आपण हा व्यवसाय करते.

दहा हजार रूपयातील दोन हजार रूपय पीडित तरूणीला आणि आठ हजार रूपये स्वता ठेवते असे महिलेने पथकाला सांगितले. हवालदार विजय पाटील यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात स्त्री व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याने सुनीत चव्हाण यांच्या विरुध्द गु्न्हा दाखल केला. त्यांना अटक करण्यात आली. चार पीडित तरूणींची सुटका करण्यात आली.