मुंबईसह लवकरच ठाणे महानगर पालिकेच्याही निवडणुका होऊ घातल्या आहेत. एकीकडे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या निवडणुकांवर टांगती तलवार असली, तरी देखील या निवडणुकांसाठी वातावरण मात्र चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आज ठाणे महानगर पालिकेचा वर्ष २०२२-२३ साठीचा अर्थसंकल्प गुरुवारी आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांना सादर केला. एकूण ३ हजार २९९ कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प असून यामध्ये ठाणेकरांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची करवाढ प्रस्तावित करण्यात आलेली नाही. त्यामुळे पालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाणेकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न पालिकेकडून करण्यात आल्याचं बोललं जात आहे.
३० लाखांच्या अखेरच्या शिलकेसह २१७० कोटी २५ लाख महसुली व ११२८ कोटी ४५ लाख भांडवली खर्च असा एकूण ३२९९ कोटी रकमेच्या खर्चाचा अर्थसंकल्प स्थायी समितीस सादर करण्यात आला आहे.
अर्थसंकल्पाचा आकार वाढला
यंदाच्या अर्थसंकल्पाचा आकार तब्बल ५४५ कोटींनी वाढल्याचं दिसून येत आहे. गेल्या वर्षी २ हजार ७५४ कोटी ७६ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. गेल्या अर्थसंकल्पात अपेक्षित धरलेल्या उत्पन्नात अपेक्षेपेक्षा जास्त वाढ झाली असून यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत ५४५ कोटींनी अर्थसंकल्प वाढला आहे.
अर्थसंकल्पात काटकसरीचं धोरण
२०२२-२३ मध्ये खर्चासाठी तरतुदी प्रस्तावित करताना उत्पन्नातील अपेक्षित घट विचारात घेऊन जवळपास सर्वच खर्चात काटकसरीचे धोरण कायम ठेवण्यात आलेले असून केवळ अत्यावश्यक असलेले नवीन प्रकल्प वगळता हाती घेतलेल्या कामांना प्राधान्य देण्यावर भर देण्यात आल्याचं अर्थसंकल्पातून दिसून येत आहे. आजमितीस महापालिकेवर रु. १४२ कोटी ७१ लाख कर्ज शिल्लक आहे. सन २०२१-२२ तसेच सन २०२२-२३ च्या अंदाजपत्रकात कर्ज अपेक्षित केलेले नाही.
ठाण्यात फिल्म इन्स्टिटयूट!
ठाणे शहरात फिल्म इन्स्टिटयूट उभारण्याचा महापालिकेचा मानस असून त्या माध्यमातून चित्रपटसृष्टीला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी सदर २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात ५ कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे.
पार्किंग सुविधा आणि भूमिगत वाहनतळ
शहरात पुरेशी पार्किंग सुविधा निर्माण करता यावी यासाठी अर्थसंकल्पात १० कोटींची तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे.
प्रदूषण नियंत्रणाकरता…
राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत केंद्रीय पंधरावा वित्त आयोगाअंतर्गत हवा प्रदूषण कमी करणे व हवेची गुणवत्ता वाढणे यासाठी ४८ कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. त्यातून ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेकरीता ८१ इलेक्ट्रीक बसेसची खरेदी, वागळे इस्टेट स्मशानभूमीमध्ये PNG शवदाहिनी बांधणे, Dust Sweeping मशीन खरेदी करणे, पालापाचोळा कचरा व्यवस्थापनासाठी Horticulture Composting Plant उभारणे, धूळ प्रदूषण नियंत्रणासाठी Mist spray machine उभारणी करणे अशी कामे प्रस्तावित आहेत.
तसेच वर्ष २०२२-२३ मध्ये अधिकचा ४८ कोटींचा निधी उपलब्ध होणार असून एकंदरीत ९६ कोटी निधीची कामे हाती घेण्यात येणार आहेत.