ठाणे : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिका प्रशासन पोलिस बंदोबस्तात अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याची कारवाई करीत आहे. मात्र, या कारवाईदरम्यान पालिकेच्या पथकाला नागरिकांच्या विरोधाला सामोरे जावे लागत असून शनिवारी मुंब्रा कौसा भागात रहिवाशांनी रस्त्यावरच मांडलेल्या ठिय्या आंदोलनामुळे पालिकेच्या पथकाला कारवाईविना माघारी परतावे लागले होते. या पार्श्वभूमीवर पालिकेने आता पोलिस बंदोबस्ताबरोबरच राज्य राखीव दलाचे पथक देण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. यापैकी काही बांधकाम प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या आहेत. त्यावर सुनावणी देताना उच्च न्यायालयाने अनधिकृत बांधकामांवरून पालिकेची कानउघडणी करत ही बांधकामे तोडण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार पालिकेची पथके संबधित इमारती रिकाम्या करून कारवाई करत आहे. अशाचप्रकारे मुंब्रा-कौसा येथील भोलेनाथ नगर मधील आनम पॅलेस इमारतीवर कारवाईसाठी गेलेल्या ठाणे महापालिकेच्या पथकाला रहिवाशांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला.

पालिकेच्या पथकाचा रस्ता रहिवाशांनी रोखून धरला होता. हातात पेट्रोलची बाटली घेऊन आत्महत्या करण्याची धमकी रहिवाशी देत होते. पथकाकडून त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू होते. मात्र, रहिवाशी रस्त्यावरून हटण्यास तयार नव्हते. यामुळे पथकाला माघारी परतावे लागले होते. पोलिस बंदोबस्त असतानाही कारवाई करणे शक्य झाले नव्हते.

या पार्श्वभूमीवर पालिकेने आता पोलिस बंदोबस्ताबरोबरच राज्य राखीव दलाचे पथक देण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. या वृत्तास पालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी देत हा बंदोबस्त मिळताच त्याठिकाणी कारवाई करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच या भागातील आणखी नऊ इमारतींवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

२४ जणांविरोधात गुन्हा दाखल कौसा भागात असलेली आनम ही आठ मजली इमारत असून याठिकाणी ४० कुटुंबाचे वास्तव्य आहे. परंतु ही इमारत कमी जागेत असल्याने त्याठिकाणी यंत्रणा पोहचता येणे शक्य नाही. त्यामुळे ही इमारत तोडण्यासाठी पालिकेचे पथक मनुष्यबळ घेऊन गेले होते. त्यावेली नागरिकांच्या विरोधामुळे पालिकेच्या पथकाला माघारी परतावे लागले होते. या कारवाईत अडथळा आणल्याप्रकरणी पालिकेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे डायघर पोलिसांनी २४ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने दिली.