ठाणे : मागीलवर्षी टीएमटी बसगाड्यांमध्ये छत गळती होणे, तांत्रिक बिघाडमुळे रस्त्यातच बसगाडी बंद पडणे अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. असे सतत होणारे प्रकार टाळण्यासाठी ठाणे परिवहन (टीएमटी) विभागाने यंदा पावसाळ्यापूर्वीच सर्व बसगाड्यांची दुरुस्ती करण्यास सुरूवात केली आहे. त्याचप्रमाणे जुन्या झालेल्या ५१ बसगाड्या भंगारामध्ये काढण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

ठाणे शहरात दिवसाला लाखो प्रवासी ये जा करतात. शहरातील वागळे इस्टेट, घोडबंदर आणि इतर भागात मोठ्याप्रमाणात औद्योगिक कंपन्या आणि लघु उद्योग तसेच खासगी कार्यालये आहेत. यामुळे विविध शहरांमधून अनेक प्रवासी कामानिमित्त ठाणे शहरात येत असतात. शहरातील अंतर्गत ठिकाणांवर रिक्षाने जाणे खर्चिक पडते. प्रवाशांना दररोज प्रवास करणे सोपे जावे म्हणुन ठाणे शहराच्या पश्चिम आणि पुर्व दिशेला ठाणे महापालिका परिवहन सेवा बस गाड्यांचा थांबा आहे. दिवसभरात अनेक प्रवासी या बसगाड्यांमधून इच्छित स्थळी जात असतात. शहरातील विविध मार्गांसह मुलुंड, बोरिवली, मिरा-भाईंदर या शहरांमध्ये ठाणे परिवहन विभागाच्या (टीएमटी) बसगाड्या धावतात. या बसगाड्यांमधून दिवसाला हजारो प्रवासी प्रवास करतात. मात्र, मागील वर्षी पावसाळ्यात टीएमटी बसगाड्यांबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच बसगाड्यांमधील दुरावस्थेच्या चित्रफिती देखील समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याचे पहायला मिळत होते. त्याचप्रमाणे यंदा अवकाळी पावसाने हजेरी लावली या पावसात देखील बसगाड्यांमध्ये छत गळती होणे, बसगाड्या रस्त्यामध्येच बंद पडणे, विद्युत यंत्रणेत बिघाड होणे अशा अनेक समस्या समोर आल्या. असे प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने पावसाळ्यापूर्वीच तांत्रिक दुरुस्ती, इंजिन तपासणी, छताची डागडुजी, लाईट्स आणि वायरींग दुरुस्ती अशा कामांना सुरुवात केली आहे.

सध्या ठाणे पालिका परिवहन(टीएमटी)ताफ्यात सुमारे ४०० हून अधिक बसगाड्या कार्यरत आहेत. यातील जुन्या असलेल्या ५१ बसगाड्यांना ऑक्टोबर २०२५ मध्ये १५ वर्ष पुर्ण होतील. यामुळे या बसगाड्या भंगारात काढल्या जाणार आहेत. तसेच इतर नविन बसगाड्यांची दुरवस्था झाल्यास लगेच त्यांची दुरूस्थी केली जाते. तसेच पावसाळ्याआधी बसगाड्यांची कामे पुर्ण केली जाणार असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.

बसगाड्यांचा प्रवास खिशाला परवडणारा

ठाणे महापालिकेच्या ठाणे परिवहन विभागाच्या बसगाड्यांमधून प्रवास करणे हे प्रवाशांच्या खिशाला परवडणारे आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक यांना अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रवासी बसगाड्यांचा वापर करत असतात. सकाळ सायंकाळच्यावेळी बसगाड्यांसाठी प्रवाशांच्या रांगाही लागत असतात.