त्या ३० हजार विद्युत मीटरची होणार तपासणी ; शिळ, मुंब्रा, कळवा भागातील विद्युत मीटर

या मोहिमेत कमी वापराची नोंद दाखविणाऱ्या त्या ३० हजार विद्युत मीटरची तपासणी करण्यात येणार आहेत

light-meter-veej-meter
(संग्रहित छायाचित्र)

 टोरेंट कंपनीकडून तपासणीसाठी पथके नियुक्त

ठाणे : शीळ, मुंब्रा तसेच कळवा भागातील तीस हजारहून अधिक ग्राहकांचा वीज वापर कमी असल्याची नोंद गेल्या महिनाभरापासून होत असून त्यामध्येही २० हजार ग्राहकांचा वीज वापर शुन्य असल्याची बाब टोरेंट कंपनीच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे अशा संशयास्पद विद्युत मीटरची तपासणी करण्याचा निर्णय टोरेंट कंपनीने घेतला आहे. यानुसार कंपनीने विशेष मोहिम हाती घेऊन त्याकरिता पथकांची नेमणुक केली आहे. त्यात वीज चोरी होत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर विद्युत कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील कळवा, शीळ आणि मुंब्रा या भागांमध्ये टोरेंट कंपनीमार्फत वीज पुरवठा करण्याचे काम करण्यात येते. याठिकाणी एकूण २ लाख ८० हजारांच्या आसपास वीज ग्राहक आहेत. वीज ग्राहकांच्या मीटरची नोंदणी घेऊन त्याप्रमाणे त्यांना वीज देयक आकारण्यात येते. मात्र, गेल्या महिनाभरात तीस हजारहून अधिक ग्राहकांचा वीज वापर कमी असल्याची नोंद झाली आहे. त्यामध्येही २० हजार ग्राहकांचा वीज वापर शुन्य तर उर्वरित २० हजार ग्राहकांचा वीज वापर ३० युनीटच्या आतमध्ये असल्याची बाब टोरेंट कंपनीच्या निदर्शनास आली आहे. घरामध्ये पंखा तसेच ट्युब लाईटचा वापर जरी केला तरी ५० युनीटपर्यंत नोंद होते. त्यामुळे या भागांमध्ये विद्युत मीटरमध्ये फेरफार करून मोठ्या प्रमाणात वीज चोरी होत असल्याचा संशय टोरेंट कंपनीला असून या पार्श्वभूमीवर अशा मीटरची तपासणी करण्यासाठी कंपनीने विशेष मोहिम हाती घेतली आहे.

या मोहिमेत कमी वापराची नोंद दाखविणाऱ्या त्या ३० हजार विद्युत मीटरची तपासणी करण्यात येणार आहेत. अशा ग्राहकांच्या घरोघरी भेटी देऊन त्यांच्या मीटरमध्ये फेरफार किंवा छेडछाड केली आहे का याची तपासणी कऱण्यात येणार आहे. तसेच ग्राहकांचा विजेचा वापर वास्तविक कमी आहे का याचीही तपासणी करण्यात येणार आहे. त्यात शून्य किंवा कमी वापर दर्शविणाऱ्या मीटरची सध्याची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे मीटरमध्ये छेडछाड करण्याचे गैरप्रकार काही ग्राहकांकड़ून होत असतील, असा संशय कंपनीला आहे. तपासणीत तसे आढळून आले तर दोषींविरुद्ध विद्युत कायदा २००३ च्या संबंधित मार्गदर्शक तत्त्वांनुसार लागू कारवाई करण्यात येणार आहे. वीजचोरी हा फौजदारी गुन्हा आहे. त्यामुळे या गुन्ह्यात तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात, याची ग्राहकांनी नोंद घ्यावी, अशी माहिती टोरेंट कंपनीचे माहिती व जनसंपर्क अधिकारी चेतन बदीयानी दिली. विद्युत उपकरणांमध्ये हस्तक्षेप करून वीजेचा वापर करू नये. त्यामुळे अपघात होऊन जीवितहानी देखील होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Torrent company will inspect the electricity meters in shil mumbra kalwa area zws

Next Story
ठाणे : बनावट नोटा छापणारे दोघे ताब्यात ; प्रिंटरच्या साहाय्याने घरीच करत होते छपाई
फोटो गॅलरी