ठाणे जिल्ह्यातील महत्वाची शहरं म्हणून ओळख असलेल्या बदलापूर-अंबरनाथ या भागात गेल्या काही दिवसांमध्ये करोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. शनिवारी मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर आणि अंबरनाथ या दोन्ही शहरांत मिळून ३८ नवे रुग्ण सापडले आहेत. आज सापडलेल्या नवीन रुग्णांसह बदलापूर शहराची रुग्णसंख्या २९२ तर अंबरनाथ शहराची रुग्णसंख्या ३२३ वर पोहचली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महत्वाची गोष्ट म्हणजे बदलापूर शहरातील अनेक नागरिक अत्यावश्यक सेवेसाठी दररोज मुंबईला ये-जा करत आहेत. या प्रवासादरम्यान त्यांना करोनाची लागण होत असल्याचं समोर येतंय. केल्या काही दिवसांत करोना बाधित रुग्णांमध्ये मुंबईत ये-जा करणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचं आढळून येत आहे. शनिवारी पॉजिटीव्ह अहवाल आलेल्या १९ रुग्णांपैकी १३ व्यक्ती याआधी बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्या होत्या तर उर्वरित ६ व्यक्ती या अत्यावश्यक सेवेसाठी दररोज बदलापूरवरुन मुंबईच्या दिशेने प्रवास करत होत्या. दरम्यान बदलापुरात आज एका व्यक्तीच्या मृत्यूचीही नोंद झालेली असून आतापर्यंत शहरात एकूण ९ रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाने शहरातील ६१ रहिवासी संकुल प्रतिबंधीत केली आहेत.

दुसरीकडे अंबरनाथ शहरातही गेल्या काही दिवसांपूर्वी ७३ रुग्ण आढळल्यामुळे मोठी खळबळ माजली होती. यानंतर शनिवारी आणखी १९ जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. अंबरनाथ शहरातही बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या रुग्णांचं प्रमाण अधिक आहे. आतापर्यंत ७ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले असून, अद्याप १३३ जणांचे अहवाल प्राप्त होणं बाकी आहे. त्यामुळे आगामी काळात या रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Total 38 covid 19 patients found in badlapur and ambernath city psd
First published on: 06-06-2020 at 19:28 IST