डोंंबिवली – डोंंबिवलीतील तीन पर्यटकांचा पहलगाम बेसरन पठारावर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला. या तीन मृत पर्यटकांमधील हेमंत जोशी यांचा मुलगा इयत्ता दहावीत होता. मंगळवारी दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर हेमंत जोशी यांच्या मुलाने ८० टक्के गुण मिळविले आहेत. त्याच्या या यशाबद्दल त्याचे शाळे व्यवस्थापक, कुटुंबीय, नातेवाईकांकडून कौतुक केले जात आहे.

ध्रुव हेमंत जोशी हा डोंबिवली एमआयडीसीतील ओंकार इंटरनॅशनल शाळेचा विद्यार्थी आहे. आज निकाल जाहीर झाल्यानंतर आपले यश पाहण्यासाठी बाबा नाहीत, याची रुखरूख ध्रुव बरोबर त्याच्या कुटुंबीयांमध्ये आहे. ध्रुव शाळेत हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता. अभ्यासाव्यतिरिक्त शालेय, क्रीडा स्पर्धांमध्ये त्याचा उत्स्फूर्त सहभाग असायचा, असे शाळेतील शिक्षकांनी सांगितले.

दहावीनंतर ध्रुव विज्ञान शाखेत प्रवेश घेणार आहे. विज्ञान शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो वैद्यकीय शिक्षणाकडे जाणार आहे. त्याला डाॅक्टर होण्याची इच्छा आहे, अशी माहिती ध्रुव जोशीचे मामा मोहित भावे यांनी माध्यमांना दिली.

डोंबिवलीतील कौटुंबिक नाते असलेले संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी कुटुंबीय मुलांच्या परीक्षा संपल्या आहेत. पर्यटनासाठी म्हणून जम्मू काश्मीर येथे गेल्या महिन्यात गेले होते. पर्यटनाच्या पहिल्या दिवशी ते पहलगाम येथील बेसरन टेकड्यांवर मौजमजेसाठी गेले होते. त्यावेळी तेथे त्यांंच्यावर एकेक करून दहशतवाद्यांनी गोळीबार करून तिघांना ठार मारले होते. आम्ही काहीही केले नाही. आम्हाला सोडा, असे आर्जव करूनही दहशतवाद्यांनी त्यांच्या कुटुंबीयांसमोर त्यांना ठार मारले होते. आपल्या समोर आपल्या वडिलांना, कुटुंबातील सदस्याला दहशतवाद्यांनी ठार मारलय याचे अतिव दुख या मुलांबरोबर त्यांच्या कुटुंबीयांना आहे.

ध्रुवच्या यशाबद्दल डोंबिवलीतील विविध संस्था, विविध स्तरातील नागरिकांनी त्याचे दहावीतील यशाबद्दल कौतुक केले आहे.