ठाणे : राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत टाळेबंदीच्या नियमांमध्ये शिथिलता आणल्याने अनेक पर्यटकांनी जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन स्थळांवर जाण्याचे बेत आखले होते. मात्र करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पर्यटन स्थळांवर बंदी घातल्याने पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधील धरणे, तलाव आणि धबधब्यांवर मंगळवार, ८ जूनपासून पुढील आदेशापर्यंत पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, मुरबाड, शहापूर, कल्याण, भिवंडी आणि ठाणे तालुक्यांत पावसाळी पर्यटनासाठी खाडीकिनारा, धबधबे, तलाव आणि धरणे आहेत. या ठिकाणी जिल्ह्यासह मुंबई, उपनगर आणि आसपासच्या जिल्ह्यांतून पर्यटक येत असतात. त्यामुळे अनेकदा अतिउत्साही पर्यटकांमुळे जीवितहानी होण्याचा धोका वाढतो. जीवितहानी रोखण्याबरोबरच करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. सार्वजनिक आणि खासगी जागेत एकत्र येणे, चर्चा करणे, थांबणे, कार्यक्रमांचे आयोजन करणे, इत्यादींमुळे करोना विषाणूचा संसर्ग आणि प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढून सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यास धोका होऊ  शकतो. या अनुषंगाने अशा पर्यटनस्थळी जीवितहानीबरोबरच करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून मनाई आदेश लागू केले आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tourists banned from rainy tourist destinations state government break the chain akp
First published on: 09-06-2021 at 00:11 IST