रस्ते रुंद झाल्यावर वाहतूक कोंडी दूर होईल. पादचाऱ्यांना चालण्यासाठी पुरेसे पदपथ असतील, ही अपेक्षा सपशेल फोल ठरली आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी दाखविलेल्या सुंदर आणि स्मार्ट शहराच्या स्वप्नाचा चक्काचूर झाला आहे. मोकळ्या झाल्यावर जुन्या स्टेशन रोड परिसरात पुन्हा एकदा फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडले आहे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फेरीवाल्यांना कंटाळलेल्या ठाण्यातील व्यापाऱ्यांनी अखेर राज्य सरकारकडे धाव घेतली आहे. नव्या, रुंद रस्त्यासाठी पदरची जागा महापालिकेच्या ताब्यात दिल्यानंतर दुकानांसमोर लहानग्या का होईना वाहनतळाची व्यवस्था होईल, अशी स्वप्ने रंगवत ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांना जाहीर पाठिंबा व्यक्त करणाऱ्या जुन्या स्टेशन रोडवरील व्यापाऱ्यांचा सध्या अपेक्षाभंग झाला आहे. या नव्या कोऱ्या रस्त्यावर जागोजागी फेरीवाल्यांनी व्यवसाय थाटले आहेत. त्यामुळे बेधडक कारवाई करत लक्षावधी रुपयांचे पाणी करत या रस्ते उभारणीचा प्रपंच कुणासाठी आणि कशासाठी मांडला गेला, असा सवाल सर्वसामान्य ठाणेकरांनाही पडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून जयस्वाल ओळखले जातात. त्यामुळे सरकारदरबारी त्यांच्या शब्दाला वजन आहे. मुख्यमंत्र्यांसोबत असलेल्या जवळिकीतून पोलीस खात्यातही त्यांनी मित्र जमवले आहेत. एकंदरीत राजकीय, प्रशासकीय वर्तुळात जयस्वाल यांनी वर्ष-दीड वर्षांत स्वत:चा दबदबा निर्माण केला आहे. त्यामुळे स्टेशन अथवा तत्सम एखाद्या मार्गावरील फेरीवाल्यांना हटविणे हे त्यांच्यासाठी निश्चितच अवघड नाही. एरवी अशी कारवाई सुरू होताच प्रशासकीय अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव येत असतात. मात्र सद्य:स्थितीत अशा कोणत्या दबावाला भीक घालण्याचेही कारण नाही. असे असतानाही सुटसुटीत प्रवासाचे स्वप्न दाखवीत रुंद झालेल्या जुन्या ठाणे स्टेशन रस्त्यावर फेरीवाल्यांचे जथे बसत असतील तर व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक अशा दोघांचाही हा विश्वासघात ठरेल.

मध्य रेल्वे मार्गावरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक म्हणून ठाणे ओळखले जाते. या शहराची लोकसंख्या वाढीचा वेग मोठा आहेच, शिवाय घोडबंदरसारख्या नव्याने विस्तारणाऱ्या क्षेत्रामुळे एकमेव रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा भार दिवसागणिक वाढतोच आहे. अशा परिस्थितीत विस्तारित स्थानकाचा प्रकल्प प्रत्यक्षात यावा यासाठी युद्धपातळीवर सुरूझालेल्या प्रयत्नांचे ठाणेकरांनी स्वागतच केले आहे. तरीही मूळ शहरात दाटीवाटीने उभ्या असलेल्या स्थानकाच्या आसपासचा परिसर दळणवळणासाठी किमान सुसह्य़ करणे ही काळाची गरज होऊन बसले आहे. केंद्र  सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या स्मार्ट शहरांच्या यादीत ठाणे, कल्याण, डोंबिवली यांसारख्या शहरांची निवड केली आहे. या योजनेत ठाण्याची निवड व्हावी यासाठी महापालिकेने तयार केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालात रेल्वे स्थानक परिसरातील विस्तृत नियोजनाचा समावेश करण्यात आला आहे. समूह विकास योजनेच्या माध्यमातून या संपूर्ण परिसराच्या पुनर्विकासाचे सूतोवाचही मध्यंतरी महापालिका प्रशासनाने केले होते. तसा आराखडाही केंद्र सरकारला सादर करण्यात आला आहे. पुनर्विकासाचा आराखडा हा दूरगामी नियोजनाचा भाग असला तरी सद्य:स्थितीत या भागातील दळणवळण सोयीचे व्हावे यासाठी लहान टप्प्यात काही कामे करण्याची आवश्यकता साधारण नऊ महिन्यांपूर्वी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी जाणवली. त्यामुळे शहर विकास विभागाच्या मदतीने विकास आराखडय़ात नमूद केल्याप्रमाणे रस्त्यांच्या रुंदीकरणाची कामे हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला. जुन्या आणि महामार्गापलीकडे झपाटय़ाने विकसित होत असलेल्या नव्या ठाण्यासाठी हमरस्ता ठरणाऱ्या पोखरण रस्त्याच्या रुंदीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आल्यानंतर जयस्वाल यांनी रेल्वे स्थानक परिसराकडे आपला मोर्चा वळविला. स्थानकातून जांभळी नाक्याच्या दिशेने निघणाऱ्या सुभाष पथ आणि जुन्या स्टेशन रोडवर झालेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीसाठी हा रस्ता बंद करण्यात आला होता. फेरीवाले, अतिक्रमणांमुळे ठाणेकरांना या भागातून चालणेही कठीण होऊन बसले होते. या अतिक्रमण कोंडीतून ठाणेकरांची सोडवणूक करण्याचा विडा जयस्वाल यांनी उचलला. विकास आराखडय़ानुसार रस्त्याचे रुंदीकरण करायचे असल्याने या भागातील फेरीवाल्यांवर कारवाई करावी लागणारच होती शिवाय काही व्यापाऱ्यांनी केलेले वाढीव बांधकामही जमीनदोस्त करावे लागणार होते. याशिवाय रुंदीकरणासाठी काही व्यापाऱ्यांच्या जागा संपादित करून त्यांना विकास हस्तांतरण हक्क अथवा अन्य मोबदला देण्यासंबंधी विचारही करावा लागणार होता. खरे तर राजकीय हस्तक्षेपामुळे हा संपूर्ण परिसर अतिक्रमणमुक्त करणे सोपे काम नव्हते. या भागातील काही व्यापाऱ्यांचे असलेले राजकीय लागेबांधे कारवाईच्या आड येण्याची शक्यताच अधिक होती. मात्र कोणत्याही परिस्थितीत या संपूर्ण परिसराचा कायापालट करण्याचा विडा उचलून जयस्वाल आणि महापालिकेतील त्यांचे सहकारी कामाला लागले. बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येमुळे निर्माण झालेल्या वातावरण या काळात त्यांच्या पथ्यावर पडले. महिना, दोन महिना सातत्याने या भागात मोहिमा राबवीत हा परिसर अतिक्रमणमुक्त करण्यात आला. या काळात स्थानिक व्यापाऱ्यांसोबत जयस्वाल आणि त्यांच्या चमूने सातत्याने चर्चा केल्या. पुनर्वसन तसेच इतर मोबदल्याविषयी चर्चा केली. रस्ता रुंद झाल्यास त्याचा उपयोग व्यापारवृद्धीसाठीच होईल हे पटवून देण्यात आले. शहर विकास विभागाचे ठरावीक अधिकारीही या कामात महत्त्वाची भूमिका बजाविताना दिसले. याचा परिणाम असा झाला की व्यापाऱ्यांच्या एका मोठय़ा गटाने जयस्वाल यांच्या या मोहिमेस जोरदार पाठिंबा दिला. अतिक्रमण हटले, रस्ता रुंद झाला आणि शुभारंभाचा दिवस ठरला. त्या दिवशी ठाण्यातील बडय़ा राजकीय नेत्यांच्या हस्ते रस्ता शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र तेथील व्यापाऱ्यांच्या नजरा खिळल्या होत्या त्या जयस्वाल यांच्या आगमनाकडे. महापालिका आयुक्तांचे आगमन होताच व्यापाऱ्यांनी त्यांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या, फटाके वाजवून आनंद साजरा केला. हे चित्र अनेकांसाठी अचंबित करणारे होते. रुंद, मोकळ्या रस्त्यामुळे व्यापारी, प्रवासी यांच्यासाठी जयस्वाल हिरो ठरले होते. हा सर्व इतिहास उगाळायचे कारण म्हणजे की, रुंद रस्त्याच्या शुभारंभाला तीन-चार महिन्यांचा कालावधी लोटत असताना नेमके उलट चित्र या भागात दिसू लागले आहे. जागोजागी फेरीवाल्यांचा विळखा पडल्याने व्यापारी त्रस्त बनले आहेत. वारंवार तक्रारी करूनही महापालिकेत कुणी दाद देत नाही, असा अनुभव येऊ लागला आहे. जयस्वाल यांच्या भेटीच्या वेळ मागूनही ती मिळत नसल्याने आपण फसवलो तर गेलो नाही ना अशी भावना येथील व्यापारी प्रतिनिधींमधून व्यक्त होऊ लागली आहे. महापालिकेकडून प्रतिसाद मिळत नाही हे पाहून काहींना स्पीड पोस्टद्वारे जयस्वाल यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. काहींनी आपलं सरकार या सरकारी पोर्टलवर तक्रारी नोंदविल्या आहेत. चार महिन्यांपूर्वी आयुक्तांच्या जयजयकाराच्या घोषणा देणारा आवाज आता टिकेत परिवर्तित होऊ लागला आहे. पूर्वी होती ती परिस्थिती बरी होती, अशा तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत.

रुंदीकरणाला अतिक्रमणांचा फास

जुना ठाणे स्टेशन रस्ताच नव्हे तर महापालिकेने रुंदीकरण केलेल्या सर्वच रस्त्यांची अवस्था ही अशी आहे. घोडबंदर मार्गावर सव्‍‌र्हिस रस्त्यांची उभारणी करून महापालिका आयुक्तांनी अमाप प्रसिद्धी पदरात पाडून घेतली. कळवा, मुंब्रा यासारख्या भागांतही फेरीवाल्यांवर कारवाई करत हा संपूर्ण परिसर अतिक्रमणांच्या विळख्यातून दूर केला. ठाणेकरांच्या गळ्यातील ताईत झाल्याप्रमाणे इतके दिवस जयस्वाल यांचा वावर असायचा. हळूहळू हे चित्र बदलू लागले आहे. दोन्ही बाजूंनी विस्तीर्ण झालेल्या पोखरण रस्त्यावर जागोजागी फेरीवाले बसू लागले आहेत. बेकायदा रिक्षा, बस थांबे उभे राहू लागले आहेत. घोडबंदरच्या सव्‍‌र्हिस रस्त्यावर लगतच असलेल्या दुकानांमधील ग्राहकांचे बेकायदा वाहनतळ उभे राहू लागले आहे. तेथील काही भागांतही फेरीवाल्यांना आयता रुंद रस्ता मिळाला आहे. रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांच्या माध्यमातून महिन्याकाठी होणारी लाखो रुपयांची हप्तेबाजी शेंबडय़ा पोरालाही ठाऊक झाली आहे. रुंद रस्त्यावर धंदा थाटण्यासाठी तर मासिक हप्ता आणखी वाढल्याचे सूत्र सांगतात. सगळीकडे ही बजबजपुरी माजली असताना एरवी धडाकेबाज कामगिरीसाठी ओळखले जाणारे जयस्वाल आहेत कुठे, असा सवाल ठाणेकर उपस्थित करू लागले आहेत. महापालिका ऐकत नाही म्हणून थेट शासनाचे दरवाजे थोटविण्याची वेळ ठाणेकरांवर आली आहे. जनतेचे आयुक्त असे बिरुद इतके दिवस अभिमानाने मिरविणाऱ्यांसाठी हा सूचक इशाराच म्हणायला हवा.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traders demand action against hawkers in thane
First published on: 27-09-2016 at 00:51 IST