ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतुक कोंडी टाळण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सेवा रस्त्याचे खोदकाम ठाणे महापालिकेने केल्याने त्याचा फटका सकाळ, सायंकाळी या मार्गावरून वाहतुक करणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. कोंडीचा ताप त्यात ऊन्हाचे चटके त्यात ध्वनी आणि वायू प्रदूषण अशा दोन्हीच्या माऱ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मागील दोन महिन्यांपासून जलवाहिनी टाकण्यासाठी येथील रस्त्याचे खोदकाम सुरू आहे. त्यामुळे हे काम केव्हा पूर्ण होईल असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
पूर्व द्रुतगती महामार्गावरून मुंबई मार्गे ठाणे, घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करत असतात. गेल्याकाही वर्षांपासून या महामार्गावर वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो चार मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. मेट्रो मार्गिकेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठिकठिकाणी पत्र्याचे मार्गावरोधक उभारले आहेत. त्यामुळे रस्ते अरुंद झाले आहे. येथील सेवा रस्त्याचा वाहन चालकांकडून मोठ्याप्रमाणात वापर होतो. येथील कॅडबरी जंक्शन परिसरात माॅल, एक खासगी रुग्णालय आहे. तसेच सेवा रस्त्यालगत लोकवस्ती देखील आहे.
त्यामुळे या सेवा रस्त्याचा वापर नागरिकांकडून अधिक होतो. शनिवार, रविवारी आणि सुट्ट्यांच्या दिवसांत माॅलमध्ये खरेदीसाठी येणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे वाहनांचा भार वाढतो. असे असतानाच, केंद्र शासनाच्या अमृत २.० योजनेच्या अंतर्गत ठाणे महापालिकेकडून वर्तकनगर आणि लोकमान्य नगर विभागातील पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेचे विस्तारीकरण केले जात आहे. या कामासाठी महापालिकेकडून दोन महिन्यांपूर्वी कॅडबरी जंक्शन ते विवियाना माॅल पर्यंत सेवा रस्त्याची एक वाहिनी पूर्ण पणे खोदली आहे. त्यामुळे सेवा रस्त्याच्या एकाच वाहिनीवरून दोन्ही दिशेकडील वाहनांची वाहतुक सुरू आहे. या खोदकामाचा परिणाम येथील वाहतुक व्यवस्थेवर होत आहे. दररोज वाहनांच्या वाहनांच्या रांगा लागत आहेत. अनेकदा वाहन चालकांमध्ये वादाचे प्रसंगही उद्भवत आहेत. वाहतुक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. कॅडबरी जंक्शन ते माजिवडा पेट्रोल पंप हे दोन ते तीन मिनीटांचे अंतर गाठण्यासाठी वाहन चालकांना १५ ते २० मिनीटे लागत आहेत.
नेमके काय होते
पोखरण रोड क्रमांक दोन, गांधीनगर, वसंत विहार येथून ठाणे, मुंबईच्या दिशेने वाहतुक करणारे वाहन चालक कॅडबरी सेवा रस्त्याने कॅडबरी जंक्शन गाठतात. त्यानंतर मुख्य महामार्गावर वाहतुक करतात. येथे खासगी रुग्णालय आणि माॅल आहे. रुग्णालय परिसरात रुग्णांचे नातेवाईक तसेच माॅलमध्ये ठाणे तसेच इतर शहरातून खरेदी, चित्रपट पाहण्यासाठी येणाऱ्यांची गर्दी होत असते. त्यांच्या वाहनांचा सेवा रस्त्यावर भार येत असतो. त्यातच हा मार्ग खोदल्याने दररोज सकाळी आणि रात्रीच्या वेळेत कोंडी होऊ लागली आहे. मेट्रो स्थानकाचे काम देखील येथे सुरू आहे. त्यामुळे रस्ता आणखी अरुंद झाला आहे. शिल्लक असलेल्या वाहिनीवर काही ठिकाणी महापालिका, एमएमआरडीएचे कंटेनर देखील ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे कोंडीत भर पडते.
याबाबत ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा आणि बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना विचारले असता, मे महिन्याच्या अखेरीस सेवा रस्ता पुन्हा डांबरीकरण करुन सुरु केला जाईल अशी माहिती त्यांनी दिली.