ठाणे : घोडबंदर मार्गावरील गायमुख घाटात रस्त्याचे डांबरीकरण सुरू असल्याने अवजड वाहनांसाठी घोडबंदर मार्ग बंद करण्यात आला आहे. येथील वाहनांना भिवंडी, वसई या पर्यायी मार्गाने गुजरातच्या दिशेने वाहतुक करावी लागते. पर्यायी मार्ग वळसा घालून असल्याने अवजड वाहन चालकांनी तेथून जाण्यास नकार दिला. त्याचा परिणाम पूर्व द्रुतगती महामार्गवर झाला आहे. माजिवडा ते कोपरी पूलापर्यंत वाहतुक कोंडी झाली होती.

गायमुख घाटात रस्ते दुरुस्तीचे काम सुरू आहे. या कामामुळे वाहतुक बदल लागू करण्यात आले होते. या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी आहे. तर हलक्या वाहनांना प्रवेश आहे. त्यामुळे अवजड वाहन चालकांना गुजरातच्या दिशेने जाण्यासाठी मुंबई नाशिक मार्गाचा वापर करावा लागत होता. हा मार्ग वळसा घालून असल्याने अवजड वाहतुकदारांनी मंगळवारी दुपारी त्यांची वाहने भर रस्त्यात थांबवून ठेवली. त्याचा परिणाम येथील वाहतुक व्यवस्थेवर झाला.

पूर्व द्रुतगती महामार्गावर माजिवडा ते कोपरी पूलापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या वाहतुक कोंडीमुळे घोडबंदर, भिवंडी, नाशिकच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या चालकांचे हाल झाले. अवघ्या १० मिनीटांसाठी सुमारे अर्धा तास लागत होता. अखेर अवजड वाहन चालकांनी मुंबई नाशिक महामार्गाने वाहतुक सुरु केल्यानंतर येथील वाहतुक कोंडी सुटली.