ठाकुर्ली पुलावर भार वाढल्याने वाहनचालकांना मनस्ताप; कळवा-मुंब्राही कोंडीमय

कल्याण, डोंबिवली, ग्रामीण मतदारसंघांतील प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी गुरुवारी सकाळी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याने शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवार कार्यकर्त्यांसह वाजतगाजत निवडणूक कार्यालयाकडे गेले. यावेळी वाहनांचा ताफा, दुचाकी असा लवाजमा सोबत होता. त्यात कोपर उड्डाण पूल बंद असल्याने आणि वाहतुकीसाठी ठाकुर्ली हा एकमेव उड्डाण पूल असल्याने वाहनांचा लोंढा पुलाजवळ एकाच वेळी येत असल्याने कोंडीला सुमार राहिला नव्हता.

सकाळी १० वाजता सुरू झालेल्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठीच्या मिरवणुका दुपारी बारा वाजेपर्यंत शहराच्या विविध रस्त्यांवरून फिरवून निवडणूक कार्यालयाकडे जात होत्या. याच वेळेत शालेय बस मुलांना घेण्यासाठी शहरात आल्याने आणि या बसचा आकार मोठा असल्याने जागोजागी कोंडी झाली होती. या कोंडीत डम्पर, ट्रक आणि इतर खासगी वाहनांचा भरणा होता. कोंडी टाळण्यासाठी जागोजागी वाहतूक पोलीस तैनात होते. अरुंद रस्त्यावर वाहने दसपट अशी परिस्थिती असल्याने पोलिसांची नियोजन करताना तारांबळ उडाली होती. काटई ते शिळफाटा, मानपाडा चौक, कल्याण पूर्वेत कोळसेवाडी परिसर कोंडीने गजबजले होते. या प्रकारामुळे रिक्षेतून, दुचाकीवरून ये-जा करणारे प्रवासी, पादचारी मात्र नाराजी व्यक्त करीत होते.चव्हाण, पाटील, गायकवाड यांचे अर्ज दाखल

डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रवींद्र चव्हाण, कल्याण ग्रामीणचे मनसेचे उमेदवार राजू पाटील, कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार गणपत गायकवाड यांनी गुरुवारी मुहूर्त पाहून उमेदवारी अर्ज भरले.