लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : डोंबिवली पूर्व भागातील टिळक रस्त्यावरील ब्राह्मण सभेच्या पाठीमागील बाजुस असलेल्या पालिका शाळेच्या प्रवेशव्दारावर महावितरणचे अनेक वर्षापासून रोहीत्र होते. महावितरणने हे रोहीत्र काढून नेले. पण रोहित्राच्या सभोवती असलेली संरक्षित भिंत आहे त्या स्थितीत ठेवली. ही भिंत आता वाहतुकीला मोठा अडथळा येत आहे.

या रस्त्याच्या दुतर्फा चारचाकी, दुचाकी वाहने उभी करून ठेवलेली असतात. रेल्वे स्थानक भागातील काही रस्ते काँक्रीट कामांसाठी खोदून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे दुचाकी, मोटार कार चालक मिळेल त्या जागेत, रस्त्यावर वाहने उभी करून नोकरीच्या ठिकाणी निघून जात आहेत. ब्राह्मण सभेच्या पाठीमागील बाजुला कल्याण डोंबिवली पालिकेची शाळा आहे. या शाळेच्या टिळक रस्ता ते आगरकर रस्ता दरम्यानच्या छेद रस्त्यावर, शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजुला महावितरणचे एक रोहीत्र होते. हे रोहीत्र रस्त्याच्या मध्यभागी होते. हे रोहीत्र पालिकेच्या सूचनेवरून रस्ता रुंदीकरण आणि काँक्रीट कामासाठी महावितरणने काढून टाकले. या रोहित्राच्या बाजुला संरक्षित भिंत होती. ही भिंत महावितरणने काढून टाकली नाही. त्यामुळे मुख्य वर्दळीच्या रस्त्यात ही भिंत येत असल्याने वाहन चालकांना अडथळा येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रस्त्याच्या दुतर्फा वाहने आणि निमुळत्या जागेतून दुचाकी, चारचाकी वाहने येजा करत असल्याने टिळक रस्ता ते आगरकर रस्त्या दरम्यानच्या छेद रस्त्यावर दिवसभर कोंडी असते. रोहीत्र काढल्याने रस्ते ठेकेदाराने या भागातील रस्ता रूंदीकरण करून काँक्रीट रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांची आहे. या छेद रस्त्यावर खाद्य पदार्थ विक्री, वैद्यकीय सेवा देणाऱ्या सेवेची केंद्रे आहेत. त्यांनाही या कोंडीचा सर्वाधिक त्रास होतो. पेंडेसनगर, सावरकर रस्ता भागातून मानपाडा रस्ता, पालिकेकडे जाणारे वाहन चालक ब्राह्मण सभेजवळील छेद रस्त्यावरून आगरकर रस्त्याने इच्छित स्थळी जातात. त्यांना रस्त्यावरील भिंतीचा सर्वाधिक त्रास होतो.

महावितरणने रोहीत्र काढून नेल्यानंतर तेथील संरक्षित भिंत काढणे आवश्यक होते. ती भिंत काढली नसेल. तेथील अडथळे दूर केले नसतील तर ते महावितरणच्या अधिकाऱ्यांना काढून टाकण्यासाठी पालिकेकडून सांगण्यात येईल. -मनोज सांगळे, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग.