डोंबिवली पूर्व-पश्चिम भाग जोडणारा शहरातील सर्वाधिक महत्वाचा ठाकुर्ली उड्डाण पूल गेल्या काही दिवसांंपासून दररोज सकाळी, रात्री आठ वाजल्यानंतर वाहन कोंडीत अडकत आहे. या पुलाजवळील स. वा. जोशी शाळेजवळील वल्लभाई पटेल रस्ता काँक्रीटीकरणासाठी खोदून ठेवला आहे. त्यामुळे सर्व वाहने पुलाजवळ डावे वळण घेऊन अरूंद रस्त्यावरून ठाकुर्ली दिशेने जात आहेत. या अरूंद रस्त्यात वाहने अडकून पडत असल्याने पुलाला दररोज कोंडीचा विळखा पडत आहे.

डोंबिवली पश्चिमेतून ठाणे, कल्याण, मुंबई आणि इतर भागात जाणारा बहुतांशी प्रवासी ठाकुर्ली पुलावरून किंवा कोपर उड्डाण पुलावरून इच्छित स्थळी जातो. ठाकुर्ली पुलावरून ठाकुर्लीतून ९० फुटी रस्त्याने पत्रीपूल मार्गे, शिळफाटा मार्गे इच्छित स्थळी जाण्यास प्रवासी पसंती देतात. हा मार्ग वाहन कोंडी मुक्त असल्याने प्रवासी याच रस्त्याला अलीकडे पसंती देतात. कोपर पुलावरून प्रवास करताना टंडन रस्ता, दत्तनगर चौक भागातील कोंडीला सामोरे जावे लागते. शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, भारती मोरे यांच्या प्रभागातील रस्त्यावरील मासळी बाजार, भाजी बाजार त्यामुळे दररोज प्रवासी दत्तनगर भागात कोंडीत अडकतात. हा बाजार चांगल्या भागात स्थलांतरित करण्यासाठी शहरप्रमुख राजेश मोरे प्रयत्न करत नसल्याबद्दल नागरिक नाराज आहेत. पालिकेने चार वर्षापूर्वी दत्तनगर मासळी बाजार अन्य भागात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा… ठाणे महापालिकेचे ‘कारभारी’ आता लोकसभेच्या रिंगणात

कुठे होते कोंडी

डोंबिवली पश्चिमेतून पूर्व भागात जोशी शाळेजवळ वाहने आले की यापूर्वी ही वाहने वल्लभाई पटेल रस्त्याने प्लाझ्मा रक्तपेढी वरून मंजुनाथ शाळा, घरडा सर्कल दिशेने जात होती. आता ही वाहने जोशी शाळेजवळ डावे वळण घेऊन सात ते आठ फुटाच्या अरुंद वळण रस्त्यावरून ठाकुर्ली पुलाखालून ठाकुर्ली रेल्वे फाटक ते चोळेगाव हनुमान मंदिरासमोरून ९० फुटी रस्ता किंवा इच्छित स्थळी जातात. कल्याण दिशेने येणारी सर्व वाहने याच मार्गाने ठाकुर्ली पुलाकडे जातात. ही वाहने पुला जवळील सात ते आठ फुटाच्या वळण मार्गात अडकून पडतात. अवजड वाहन चालक, जेसीबी, पोकलेने चालक याच अरुंंद रस्त्यावरून वाहने घेऊन जातात. या वळणात वाहने अडकली की पुलावरून येणारी सर्व वाहने रांगेत अडकतात. पश्चिमेकडून येणारे दुचाकी स्वार सुसाट वेगाने पूर्व भागात पुलाच्या प्रवेशव्दारात येतात आणि पुलावरील दोन्ही मार्गिका बंद करून टाकतात. त्यामुळे दररोज रात्री आठ वाजल्यानंतर ठाकुर्ली पूल कोंडीत अडकत आहे. संंध्याकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत जोशी शाळेजवळ दोन वाहतूक पोलीस तैनात करण्याची प्रवाशांची मागणी आहे.

हेही वाचा… ठाणे: बाळकूम भागात मोठे वाहतूक बदल

डोंबिवली कोंडीत

महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांंचे अर्ज भरताना सर्वाधिक गर्दी होते. इतर अपक्ष आणि अन्य पक्षांंचे उमेदवार अर्ज भरताना खूप गर्दी नसते. गुरुवारी शिवसेनेचे खासदार डाॅ. श्रीकांंत शिंदे यांंचा उमेदवारी अर्ज भरून झाल्यानंंतर कोळसेवाडी वाहतूक विभागाने घरडा सर्कल रस्ते सुरू करावेत अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रतिक्रिया

उमेदवारांच्या अर्जासाठी दिवसभर घरडा सर्कल रस्ते बंद ठेऊन वाहतूक विभाग अन्य भागात वाहतूक कोंडी निर्माण करत आहेत. ठाकुर्ली पुलाजवळ दररोज सकाळ, संध्याकाळ वाहतूक पोलीस तैनात केले तर ही कोंडी होणार नाही. – अतुल आपटे, रहिवासी