डोंबिवली : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील नेहरु रस्ता, फडके रस्ता, चिमणी गल्ली या पादचरी वर्दळीच्या भागात फेरीवाल्यांनी पुन्हा बस्तान बसविण्यास सुरुवात केली आहे. आता तर सर्वाधिक वर्दळीचा मानपाडा रस्त्याची एक बाजू फेरीवाल्यांनी व्यापून व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे या भागात दररोज वाहतूक कोंडी होत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत.

कस्तुरी प्लाझा संकुला जवळील शिवमंदिरकडे जाणारी टाटा मार्गिका यापूर्वीच फेरीवाल्यांनी व्यापून टाकली आहे. आता मुख्य वर्दळीच्या मानपाडा रस्त्यावर शिवसेना मध्यवर्ति शाखा ते कस्तुरी प्लाझा संकुला दरम्यान फेरीवाल्यांनी बसण्यास सुरुवात केल्याने नागरिक हैराण आहेत. फेरीवाल्यांना हटविण्यासाठी पालिकेत यंत्रणा आहे की नाही, असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. सोमवारी संध्याकाळी पाच वाजल्या पासून मानपाडा रस्त्याची एक बाजू फेरीवाल्यांनी व्यापून टाकली होती. या ठिकाणी खरेदीसाठी झुंबड उडाली होती. वाहनांना मानपाडाकडे जाण्यासाठी रस्ता शोधत जावे लागत होते. अर्धा तास शिवसेना मध्यवर्ति शाखा ते कस्तुरी प्लाझा दरम्यान फेरीवाल्यांमुळे कोंडी झाली होती.

हेही वाचा >>> येऊरच्या संवेदनशील क्षेत्रात गाड्यांची वाहतूक करण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्याकडूनच लाचेची मागणी

फ प्रभागाच्या हद्दीत हा भाग येतो. फेरीवाला हटाव पथकातील १६ कामगार मात्र मानपाडा रस्त्यावर बसलेल्या फेरीवाला बाजाराकडे दुर्लक्ष करत पालिकेच्या आवारात बसले होते. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील कैलास लस्सी, नेहरु रस्ता, चिमणी गल्ली, परिसर फेरीवाल्यांनी गजबजून गेला होता. संध्याकाळच्या वेळेत नागरिक कामावरुन घरी परतत असतात. त्यांना रेल्वे स्थानकातून बाजीप्रभू चौकातील केडीएमटी बस थांबा, रिक्षा वाहनतळावर जाताना कसरत करावी लागते. बहुतांशी फेरीवाले मुंब्रा, भायखळा, अंधेरी, मस्जिद बंदर भागातून येऊन या भागात व्यवसाय करतात.

हेही वाचा >>> डोंबिवलीत अर्धवेळ नोकरीचे आमिष दाखवून सात जणांची १९ लाखांची फसवणूक

फ प्रभागातील कामगार अरुण जगताप हे फेरीवाला हटाव पथकात कार्यरत नसुनही तेच रस्त्यांवरील फेरीवाल्यांचे कोणी कुठे कसे बसावे याचे नियोजन करतात, अशा तक्रारी आहेत. गेल्या वर्षी परिमंडळ उपायुक्त स्वाती देशपांडे यांनी फ प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातून अरुण जगताप यांनी काढून टाकले आहे. तरीही दररोज संध्याकाळी जगताप हे रेल्वे स्थानक भागात फेरीवाल्यांशी हितगुज करतात. जगताप यांच्यामुळेच डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील फेरीवाले हटत नसल्याचे कर्मचारी खासगीत सांगतात. जगताप यांना एका राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्याचा पाठिंबा असल्याचे समजते.

आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे, अतिरिक्त मंगेश चितळे यांनी जगताप या कामगाराची त्यांच्या मूळ खात्यात बदली करावी किंवा त्यांना टिटवाळा, खडेगोळवली भागात बदली करण्याची मागणी अनेक जागरुक नागरिकांकडून केली जात आहे. जगताप यांच्या कार्यपध्दतीच्या अनेक तक्रारी गेल्या दोन वर्षात आयुक्तांकडे आहेत.

स्कायवाॅकखाली टपऱ्या

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाखाली पालिका अधिकाऱ्यांशी संधान साधून काही वजनदार मंडळींचा आशीर्वाद घेऊन समाजकंटकांनी टपऱ्या ठेवण्यास सुरुवात केली आहे. अगोदरच रेल्वे स्थानक भागात रिक्षा वाहनतळ, पादचाऱ्यांमुळे पाय ठेवण्यास जागा नाही. त्यात टपऱ्या वाढल्या तर या भागात चालणे अवघड होईल, असे या भागातील व्यापाऱ्यांनी सांगितले. फ प्रभागातील फेरीवाला हटाव पथकात ह प्रभागातील बाजीराव अहेर यांची नियुक्ती करावी अशी मागणी नागरिक करत आहेत. डोंबिवली पूर्व भाग फेरीवालामुक्त करण्यात यापूर्वी अहेर यांचा महत्वाचा वाटा होता. काही अधिकाऱ्यांनी ते फेरीवाला कारवाईत अडथळा ठरत असल्याने त्यांची ह प्रभागात बदली केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“फ प्रभागाची फेरीवाल्यांवर आक्रमक कारवाई सुरू असते. मानपाडा रस्त्यावर बसलेल्या फेरीवाल्यांचे दोन टेम्पो साहित्य सोमवारी जप्त केले. पदपथ, रस्ते अडविणाऱ्या फेरीवाल्यांवर फौजदारी कारवाई सुरू करणार आहेत.”

मुरारी जोशी, पथक प्रमुख फ प्रभाग, डोंबिवली