बाळकुम परिसरात वाहतूक कोंडी, अपघाताची भीती; पर्याय नसल्यामुळे परवानगी दिल्याचा वाहतूक पोलिसांचा दावा
किशोर कोकणे लोकसत्ता
ठाणे : ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो प्रकल्पामुळे नवी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मिळण्याबरोबरच वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे असले तरी या प्रकल्पासाठी रस्त्याच्या मधोमध उभारण्यात येणाऱ्या खांबामुळे बाळकुम परिसरात भविष्यात वाहतूक कोंडीचे मोठे दुखणे वाढण्याबरोबरच येथे अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. मेट्रोच्या उभारणीसाठी हा खांब रस्त्याच्या मधोमध उभारण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. त्यामुळे या खांबाच्या उभारणीस परवानगी द्यावी लागल्याचा दावा वाहतूक पोलिसांकडून करण्यात आला आहे.
ठाणे, भिवंडी आणि कल्याण या शहरांतील नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध व्हावा तसेच रेल्वे आणि रस्त्यावरील वाहतुकीचा भार कमी व्हावा या उद्देशातून मेट्रो प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. ठाणे, भिवंडी आणि कल्याण ही तीन शहरे मेट्रोच्या माध्यमातून एकमेकांना जोडण्यात येणार असून त्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यात कापूरबावडी, बाळकुम, कशेळी-काल्हेर, भिवंडी आणि कल्याण भागातील मार्गावर मेट्रोसाठी खांब उभारण्यात येत आहेत. परंतु बाळकुम भागात रस्त्याच्या मधोमध उभारण्यात येणारा खांब भविष्यात वाहतुकीसाठी अडथळा ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बाळकुम येथून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या पायथ्याशी असलेल्या रस्त्यालगत मेट्रोसाठी खांब उभारण्यात येणार आहे. हा खांब रस्त्याच्या मधोमध उभारला जाणार आहे. काल्हेरपासून ते बाळकुमपर्यंत रस्त्याच्या दुभाजकामध्येच मेट्रोसाठी खांब उभारण्यात आले आहेत. परंतु बाळकुम येथील उड्डाणपुलामुळे मेट्रोचा मार्ग दुसऱ्या ठिकाणी वळवावा लागणार असून त्यासाठी उड्डाणपुलाच्या बाजू्च्या रस्त्यावरून मेट्रोची मार्गिका नेण्यात येणार आहे. त्यासाठी उड्डाणपुलाच्या पायथ्याशी असलेल्या रस्त्याच्या मधोमध खांब उभारावा लागणार आहे. त्यामुळे हा रस्ता अरुंद होण्याबरोबर बाळकुमहून कापूरबावडीच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीसाठी अडसर ठरण्याची शक्यता आहे.
वाहतुकीला अडसर
शहरातील ढोकाळी, कोलशेत, यशस्वीनगर, हायलँड, बाळकूम, मनोरमानगर, कशेळी-काल्हेर आणि भिवंडी या भागांतील प्रवाशांसह या मार्गावरून मोठय़ा प्रमाणात जड-अवजड वाहतूक सुरू असते. मुंबई-नाशिक महामार्गावर काही समस्या निर्माण होऊन कोंडी झाली किंवा दुरुस्ती कामासाठी बंद ठेवला तर या मार्गावरील वाहतूक कापूरबावडी-बाळकुम-काल्हेर मार्गे भिवंडी शहरातून वळविण्यात येते. त्यामुळे वाहतूकीच्या दृष्टिकोनातून हा मार्ग महत्त्वाचा मानला जातो. आधीच हा मार्ग मेट्रोच्या अडथळ्यांमुळे अरुंद झाला असताना त्यातच आत रस्त्याच्या मधोमध उभारण्यात येणारा खांब वाहतुकीसाठी अडसर ठरण्याची शक्यता आहे.