ठाणे : ठाणे जिल्ह्यात वाढती नागरी वस्ती यामुळे अनेक नवे प्रकल्प राबवले जात आहेत. मात्र या प्रकल्पांच्या कामांमुळे रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. खड्डे, असमांतर रस्ते, वाहतूक बदल आणि नियोजनाचा अभाव यामुळे ठाणेकरांसमोर वाहतूक कोंडीचे नवे संकट उभे राहिलं आहे. पूर्व द्रुतगती मार्ग, मुंबई-नाशिक महामार्ग आणि घोडबंदर रस्ता यांसारख्या महत्त्वाच्या मार्गांवर काही चौक, महत्त्वाचे भाग वाहतुक कोंडीचे केंद्र बिंदू ठरत आहे. त्यामुळे कोंडी केव्हा सुटणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
ठाणे जिल्ह्यातील जुने ठाण्यातील रस्ते, घोडबंदर, पूर्व द्रुतगती महामार्ग हे मार्ग महत्त्वाचे आहेत. ठाणे शहरातील घोडबंदर भागात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाची कामे सुरू आहेत. त्याचवेळी या भागात सेवा रस्त्यांचे मुख्य रस्त्यात सामावेशीकरण करण्याचे कार्य देखील सुरु आहे. तसेच पूर्व द्रुतगती महामार्गावर मेट्रो मार्गिका निर्माण आणि आनंदनगर ते साकेत उन्नत मार्गिकेच्या निर्माणाचे काम केले जात आहे. मुंबई नाशिक महामार्ग हा अरुंद असून या मार्गाचेही मागील पाच वर्षांपासून रुंदीकरणाची कामे सुरू आहेत. त्याचा परिणाम शहरातील वाहतुक व्यवस्थेवर होऊ लागल्याचे चित्र सध्या ठाण्यात आहे. त्यामुळे आता मिनीटांचा प्रवास तासांचा होऊ लागला आहे.
कुठे काय परिस्थिती
१) पूर्व द्रुतगती महामार्ग
– पूर्व द्रुतगती महामार्गावर तीन हात नाका ते माजिवडा पर्यंत मेट्रो मार्गिका (वडाळा-घाटकोपर-कासारवडवली) निर्माणाचे काम सुरू आहे. या कामासाठी अनेक ठिकाणी मुख्य मार्गिकेवर अडथळे बसविण्यात आले होते. आता हे अडथळे बहुतांश ठिकाणी हटविण्यात आले असले तरी ज्या ठिकाणी अडथळे होते. तेथील रस्ते काही भागात असमान झाले आहेत. त्यामुळे ती मार्गिकाच वापरात येत नसल्याचे दिसते. महामार्ग असूनही ही मार्गिका आक्रसत आहे. त्यामुळे मुंबईहून ठाणे, घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करताना १० ते १५ मिनीटांच्या अंतरासाठी पाऊण ते एक तास लागतो. सकाळी देखील ठाण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या चालकांना कोंडीत अडकावे लागते.
दुसरीकडे कोपरी येथील रेल्वे पूलाचे काही वर्षांपूर्वीच रुंदीकरण झाले होते. तसेच हा मार्ग सिमेंट काँक्रीटचा करण्यात आला होता. परंतु या नव्या मार्गावरच आनंदनगर उन्नत मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. त्यामुळे मुंबईहून ठाण्याच्या दिशेने वाहतुक करताना केवळ दोन ते तीन वाहिन्या चालकांना उपलब्ध होत असून हा मार्ग देखील कोंडीत अडकत आहे. त्यामुळे मुलुंड टोलनाका भागापर्यंत वाहतुक कोंडी होते. येथील कोंडीतून मार्ग काढून पुढे तीन हात नाका पूलापर्यंत पोहचल्यानंतर या अरुंद उड्डाणपूलामुळे पुन्हा एकदा कोंडीचा जाच चालकांना सहन करावा लागतो.
२) एलबीएस रोड- एलबीएस रोड मार्गे वागळे इस्टेट, मुलुंड, भांडुपच्या दिशेने देखील वाहतुक होते. या मार्गिकेवरही रस्ते खणले आहेत. तसेच येथील सिग्नल परिसरात बेकायदा टपऱ्यांमुळे मार्गिका अरुंद आहे. त्यामुळे तीन हात नाका परिसरात कोंडीचे केंद्र ठरत आहे. येथील दोन ते तीन मिनीटांचे अंतर पार करताना चालकांना १० मिनीटे लागतात.
३) घोडबंदर – घोडबंदर मार्गावर कासारवडवली, कापूरबावडी चौकात कोंडीचा सामना चालकांना सहन करावा लागतो. कासारवडवली येथे खड्डे, अरुंद रस्ते, मेट्रो मर्गिकेच्या निर्माणाची कामे यामुळे कोंडी होते. तर कापूरबावडी भागात मेट्रो मार्गिकेच्या स्थानकाचे काम सुरू आहे. येथेही वाहतुक बदल, मेट्रोच्या कामांमुळे कोंडी होते. त्यामुळे कापूरबावडी चौकात कोंडी झाल्यास १० मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी अर्धा तास लागतो.
४) मुंबई नाशिक महामार्ग- मुंबई नाशिक महामार्गावर साकेत पूल, खारेगाव पूल येथे मार्गिका अरुंद आहेत. येथून हजारो जड अवजड वाहने, हलक्या वाहनांची वाहतुक होते. येथील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम या मार्गावर सुरु असल्याने मुंबईहून नवी मुंबई, मुंब्रा, भिवंडी, नाशिकच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या चालकांना कोंडीचा सामना करावा लागतो. खड्डे पडल्यास किंवा पावसामुळे वाहनांचा वेग मंदाविल्यास अवघ्या १० मिनीटांच्या प्रवासासाठी वाहन चालकांना २० ते २५ मिनीटे लागतात.
ठाणे शहराला वाहतुक कोंडीने ग्रासले आहे. रस्त्यांची अवस्था वाईट आहे. त्यात कोंडीतून मार्ग काढताना त्रास सहन करावा लागतो. प्रशासनाने प्रकल्पासोबत बांंधलेल्या रस्त्याची किमान डागडुजी करणे आवश्यक आहे. – रणजीत पाटील, प्रवासी.