डोंबिवली- पहिल्याच पावसात कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील वाहने संथगतीने धावू लागल्याने शनिवारी संध्याकाळपासून शिळफाटा रस्ता वाहतूक कोंडीत अडकला. जड, अवजड वाहनांना रात्री १० नंतर या रस्त्यावर प्रवेश आहे. ती वाहनेही शिळफाटा संध्याकाळी सहा नंतर रस्त्यावर आल्याने वाहन कोंडीत आणखी भर पडली आहे.

पलावा चौक, काटई चौक, मानपाडा चौकापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. काही वाहन चालक वाहन कोंडीमुळे उलट दिशा मार्गिकेतून वाहने घुसवत असल्याने मोकळी असलेली मार्गिका वाहतूक कोंडीत अडकत आहे. वाहतूक पोलीस कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. एकाचवेळी जड, अवजड वाहने रस्त्यावर आल्याने पोलिसांची तारांबळ उडत आहे.

हेही वाचा >>> शहापूर: सर्पदंश करुन हत्या करणाऱ्या टोळीला अटक

शिळफाटा रस्त्यावरील कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांनी गावांमधून आलेले पोहच रस्ते बंद केले आहेत. तरीही शिळफाटा रस्त्यावरील कोंडी कमी होत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. शिळफाटा रस्त्याचे काटई, पलावा चौक भागात रुंदीकरण रखडले आहे. शासन या भागातील शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी राजकीय चढाओढीतून पुढाकार घेत नसल्याने त्याचा फटका कोंडीतून प्रवाशांना बसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पलावा चौकातील एक हाॅटेल उड्डाण पुलाला अडथळा येत आहे. हाॅटेल एका शिवसैनिकाचे आहे. या हाॅटेलचा काही भाग तोडल्या शिवाय पुलाचे काम करणे शक्य होत नाही. हाॅटेलचे बांधकाम तोडावे म्हणून मनसेचे आ. प्रमोद पाटील गेल्या वर्षीपासून शासनाकडे पाठपुरावा करत आहेत. आ. पाटील यांना या पुलाचे श्रेय मिळू नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक निकटवर्तिय या कामात अडथळा आणत आहे. या वादात पुलाचे काम गेल्या वर्षीपासून रखडले आहे. मागील काही दिवसांपासून वाहतूक पोलीस दोन्ही मार्गिका एकाच दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी खुल्या करतात. त्यामुळे येजा करणारी वाहने काटई, पलावा चौक ठिकाणी खोळंबून राहतात. या वाहनांचा रांगा लागून रस्ता कोंडीत अडकतो, असे स्थानिकांनी सांगितले. काटई ते पलावा चौक दरम्यानचा रुंदीकरण, शेतकऱ्यांना मोबदला देण्याचा तिढा शासनाने तातडीने सोडवून प्रवाशांची कोंडीतून मुक्तता करावी, अशी मागणी प्रवाशांची आहे.