Thane News: ठाणे : ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी ठाणे, घोडबंदर, पूर्व द्रुतगती महामार्ग, शिळफाटा, चिंचोटी, मुंबई अहमदाबाद मार्गावर वाहतुक कोंडी झाली होती. अनेक रुग्णवाहिका कोंडीमध्ये अडकून होत्या. महानगराच्या वाहतुक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला होता. अवघ्या काही मिनीटांच्या अंतरासाठी तासभर गेल्याने वाहतुक कोंडीच्या (ठाणे वाहतुक कोंडी) या प्रश्नावरून लाडक्या बहिणी आणि भावांकडून सरकाविरोधात कठोर शब्दांत संताप व्यक्त केला जात होता.

रक्षा बंधनाच्या दिवशी कोंडी झाल्याने लाडक्या भावांना. बहिणींना वेळेत रक्षा बंधनासाठी पोहचता आले नाही. काहीजणांना कोंडी असल्याने पुन्हा माघारी परतावे लागले. खड्डे आणि कोंडीमुळे नागरिकांचे हाल झाल्याने समाजमाध्यमाद्वारे नागरिकांकडून टीका केली जात आहे.

वाहतुक कोंडी मुक्त करण्यासाठी विविध प्रकल्प राबविण्यात आल्याचा दावा सरकारकडून केला जात असला तरी वाहतुक व्यवस्थेत कोणतीही सुधारणा आलेली नसल्याचे शनिवारी झालेल्या वाहतुक कोंडीतून स्पष्ट झाले आहे. शनिवारी रक्षा बंधन असल्याने अनेकजण रक्षा बंधनासाठी तर काहीजण कामानिमित्ताने घराबाहेर पडले होते. परंतु रक्षा बंधनाच्या दिवशी ठाणे जिल्ह्यातील घोडबंदर, मुंबई नाशिक महामार्ग, चिंचोटी भिवंडी, वाडा भिवंडी, पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच पालघर जिल्ह्यातील मुंबई अहमदाबादर मार्गावर मोठी वाहतुक कोंडी झाली होती. या वाहतुक कोंडीमुळे वाहनांच्या अक्षरश: रांगा लागल्या होत्या.

कोंडीमुळे सुमारे एक तासाच्या अंतरासाठी वाहन चालकांना तीन ते चार तास लागत होते. अनेक रुग्णवाहिका, अत्यावश्यक सेवेतील वाहने कोंडीत अडकून होते. रक्षा बंधनासाठी रस्ते मार्गोने कुटुंबासह घराबाहेर पडलेल्या सर्वसामान्य नागरिकांचे हाल झाले. तर नोकरदारांनाही कामाच्या ठिकाणी वेळेत पोहचता आले नाही. वाहतुक कोंडीच्या या प्रश्नानंतर लाडक्या बहिणींनी आणि भावांनी मात्र समाजमाध्यमांद्वारे सरकारवर टीका केली. अनेकांनी समाजमाध्यमावर व्हिडीओ प्रसारित करुन सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वाहतुक कोंडीमुळे अनेकजण रात्री ११ ते १२ वाजता घरी पोहचले.

खड्डे आणि दुरुस्तीचा वाहतुकीला फटका

ठाणे जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर खड्डे पडले आहेत. हे खड्डे तात्पुरते बुजविले जातात. परंतु पाऊस सुरु होताच, खड्डे पुन्हा त्याच ठिकाणी निर्माण होतात. दुसरीकडे गायमुख घाटाच्या मार्गाची अवस्था अत्यंत वाईट झाल्याने या रस्त्याची दुरुस्ती प्रशासनाकडून सुरू आहे. त्यामुळे अवजड वाहनांची वाहतुक गायमुख घाटातून बंद असल्याने ती चिंचोटी, भिवंडी मार्गे वळविण्यात आली. त्याचा परिणाम देखील वाहतुकीवर झाला. हा रस्ता अतिशय वाईट अवस्थेत असून अवजड वाहनांचा भार वाढल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.