ठाणे – कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित, सन्मानजनक आणि लैंगिक छळमुक्त वातावरण मिळावे यासाठी भारत सरकारने “कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३” पॉश कायदा लागू केला आहे. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी, विविध आस्थापनांमध्ये गठीत अंतर्गत तक्रार समित्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून राष्ट्रीय महिला आयोग यांच्या वतीने ठाणे येथे एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा १८ जुलै २०२५ रोजी, सकाळी १० वाजता, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात संपन्न होणार आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून जिल्ह्यातील विविध शासकीय, निमशासकीय आणि खासगी संस्थांतील वरिष्ठ अधिकारी अंतर्गत समित्यांचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित राहणार आहेत.
पॉश कायद्यांतर्गत, प्रत्येक कार्यालय, संस्था, कंपन्यांमध्ये कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण होऊ नये म्हणून अंतर्गत समितीची स्थापना बंधनकारक आहे. मात्र अनेकवेळा या समित्यांमध्ये कार्यरत असलेल्या सदस्यांना कायद्यातील तरतुदी, चौकशी प्रक्रियेचे स्वरूप, गुप्तता राखण्याचे नियम, तक्रार निवारणाची कार्यपद्धती आदींचे पूर्ण ज्ञान नसते. यामुळे कायद्याचा प्रभावी अंमलबजावणी होण्यात अडथळे येतात. ही कार्यशाळा म्हणजे याच अडचणींचे समाधान शोधणारे एक व्यासपीठ ठरणार आहे. या समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांना त्यांच्या भूमिका, जबाबदाऱ्या आणि अधिकार स्पष्टपणे समजावून देणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. या कार्यशाळेमुळे कार्यस्थळी महिला कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात मदत होणार असून, समित्यांची कार्यशैली अधिक पारदर्शक व प्रभावी होन्यास मदत होणार आहे. तर या कार्यशाळेमध्ये सहभागी होण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व संबंधित शासकीय, निमशासकीय व खासगी आस्थापनांनी स्वतःच्या कार्यालयातील समितीचे अध्यक्ष व अधिकाऱ्यांना उपस्थित राहावे , असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यशाळेमध्ये काय शिकवले जाणार?
पॉश कायद्याचे संपूर्ण स्पष्टीकरण. लैंगिक छळ म्हणजे नेमके काय? त्याचे प्रकार. तसेच तक्रार प्राप्त झाल्यानंतर तातडीने कोणती पाऊले उचलता येतील यासह चौकशी समितीची रचना आणि कामकाज, कायदेशीर कार्यवाही आणि साक्ष-पुरावे गोळा करताना घ्यावयाची काळजी यासह विविध गोष्टींचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.