लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी कल्याण येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येणार आहेत. त्यामुळे ठाणे वाहतुक पोलिसांनी मुंबई नाशिक महामार्ग, भिवंडी, मुरबाड, शहापूर, उल्हासनगर, बदलापूर येथील मुख्य मार्गांवर मोठे वाहतुक बदल लागू केले आहेत. बुधवारी रात्री १२ वाजेपर्यंत हे बदल लागू असतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याण येथील आधारवाडी परिसरात जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे सर्वच यंत्रणांकडून चोख बंदोबस्त सुरू झाला आहे. ठाणे वाहतुक पोलिसांनी परिसरात वाहतुक बदल लागू केले आहे.

आणखी वाचा-शिपाई, फेरीवाला हटाव पथकात काम करणाऱ्या सफाई कामगारांना घनकचरा विभागात हजर राहण्याचे आदेश

नाशिक येथून खारेगाव टोलनाका, मुंब्रा बाह्यवळण मार्गे उरण जेएनपीटी तसेच इतर ठिकाणी जाणार्या मार्गावरील जड अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने खारेगाव टोलनाका येथून माजिवडा, मुलुंड, ऐरोली मार्गे इच्छित स्थळी जातील. नाशिककडून रांजनोली येथून, कोनगाव एमआयडीसी, दुर्गाडी दिशेने कल्याणच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या जड-अवजड वाहनांना रांजनोली नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही रांजनोली नाका, खारेगाव टोलनाका मार्गे इच्छीत स्थळी जातील. शिळ- कल्याण मार्गे पत्रीपूलाकडे वाहतुक करणाऱ्या जड-अवजड वाहनांना बदलापूर चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने बदलापूर चौक येथून वळण घेवून लोढा पलावा मार्गे कल्याण फाटा,महापे, आनंदनगर चेकनाका मार्गे जातील.

उल्हासनगर शहरातून वालधुनी पुलावरून कल्याण दिशेने वाहतुक करणाऱ्या जड अवजड वाहनांना उल्हासनगर शहरातील शांतीनगर जकात नाका येथे प्रवेश बंदी असेल. येथील वाहने शांतीनगर जकात नाका येथून डावे वळण घेवून जातील. विठ्ठलवाडी येथून वालधुनी पुलावरून कल्याण दिशेने वाहतुक करणाऱ्या जड अवजड वाहनांना विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकासमोर प्रवेश बंदी असेल. येथील वाहने श्रीराम चौक, उल्हासनगर येथून जातील. मुरबाड येथून शहाड पूल मार्गे कल्याण दिशेने वाहतुक करणाऱ्या जड-अवजड वाहनांना म्हारळ जकात नाका येथे प्रवेश बंदी असेल. ही वाहने म्हारळ जकात नाका येथून डावे वळून घेवून उल्हासनगर मार्गे जातील. नाशिक महामार्गावरून बदलापूर, नवी मुंबई, पुणे, उरण, नाव्हाशेवा येथे वाहतुक करणारी वाहने बापगाव वरून गांधारी मार्ग होत असते. येथील जड अवजड वाहने पडघा येथील तळवली चौकी येथे प्रवेश बंदी असेल. ही वाहने ठाणे दिशेने मार्गस्थ होऊन ऐरोली मार्गे वाहतुक करतील. गुजरात येथून घोडबंदर रोडच्या दिशेने ठाणे शहरात वाहतुक करणाऱ्या वाहनांना मनोर टेप नाका, चिंचोटी नाका, फाउंटन उपहारगृह, गायमुख जकात नाका येथे प्रवेश बंदी असेल. येथील मनोर टेप नाका येथून पोशेरी, पाली, वाडानाका, शिरीपपाडा, अबिटधर, कांबरे, पिवळी वेल्हे, दहगाव मार्गे वासिंद, शहापूर, किन्हवली मार्गे माळशेज घाट मार्गे वाहतुक करतील.

आणखी वाचा-मुलुंड ठाणे स्थानकादरम्यान पोल पडल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत, रस्त्यावरील वाहतूक ठप्प

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापे नवी मुंबई मार्गे शिळफाटा येथून ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना शिळफाटा येथे प्रवेश बंदी असेल. ही वाहने महापे नवी मुंबई मार्गे शिळफाटा येथून ऐरोली मार्गे जातील. तळोजा, नवी मुंबई येथून दहिसर मोरी मार्गे कल्याण फाटा येथून कल्याणच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या जड-अवजड वाहनांना दहिसर मोरी येथे प्रवेश बंदी असेल. येथील वाहने दहिसर मोरी पनवेल मार्गे इच्छित स्थळी जातील.नवी गुंबई, शिळफाटा, खोणी कडून नेवाळी नाका मार्गे कल्याण कडे जाणाऱ्या जड अवजड वाहनांना नेवाळी नाका येथे प्रवेश बंदी असेल. ही वाहने नेवाळी नाका येथून अंबरनाथ, बदलापूर मार्गे इच्छित स्थळी जातील. बदलापूर, अंबरनाथ कडून नेवाळी नाका मार्गे कल्याण कडे जाणार्या जड अवजड वाहनांना नेवाळी नाका येथे प्रवेश बंदी असेल. ही वाहने खोणी फाटा, नावडे फाटा, नवी मुंबई मार्ग इच्छित स्थळी जातील.