ठाकुर्लीतील रेल्वे हद्दीतील बारा बंगला भागातील २५० झाडे तोडण्याचा प्रस्ताव येत्या सोमवारच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत पुन्हा चर्चेला ठेवण्यात आला. दोन महिन्यांपूर्वी ही झाडे तोडण्याचा प्रस्ताव रेल्वे सुरक्षा दलाकडून महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीसमोर ठेवण्यात आला. त्या वेळी ‘लोकसत्ता’ने याविषयी आवाज उठवताच प्रशासन आणि समितीने हा विषय स्थगित ठेवला होता.
ठाकुर्लीतील बारा बंगला भागात ६० ते ७० एकर जमिनीवर अनेक वर्षांपासून काही दुर्मीळ झाडे आहेत. डोंबिवली परिसरातील हा एकमेव हरितपट्टा आहे. तो कायमस्वरूपी रेल्वे प्रशासनाने जतन करावा. नागरिकांना प्राणवायू मिळण्यासाठी बारा बंगला हा एकमेव परिसर आहे. नागरिक या भागात सकाळ, संध्याकाळ शतपावलीसाठी येतात. त्यामुळे या भागात रेल्वे प्रशासनाने वृक्षतोड करू नये, अशी मागणी या भागाचे स्थानिक नगरसेवक श्रीकर चौधरी यांनी पालिका, रेल्वे प्रशासन आणि वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत केली आहे.
गेल्या वर्षी विकासकामाच्या नावाखाली बारा बंगला भागातील ६३ झाडे तोडण्यास महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने मंजुरी दिली होती. या वेळी खेळाचे मैदान तयार करण्यासाठी रेल्वे सुरक्षा बळाने बारा बंगला भागातील २५० झाडे तोडण्याचा प्रस्ताव महापालिकेपुढे ठेवला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रस्ताव मंजूर करावा म्हणून रेल्वे प्रशासनाकडून पालिकेवर दबाव वाढत आहे. तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्या काळात समितीसमोर हा विषय मंजुरीसाठी आला होता. त्या वेळी या परिसराची पाहणी करू मग निर्णय घेऊ असा विचार करून हा प्रस्ताव स्थगित ठेवण्यात आला होता.
वृक्ष समितीचे नगरसेवक चौधरी हेही सदस्य आहेत. वेळोवेळी बैठकीत त्यांनी या वृक्ष तोडीला विरोध केला आहे. अन्य समिती सदस्य रेल्वेच्या दबावाला बळी पडून झाडे तोडण्यास परवानगी देत असल्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. बारा बंगला भागात हजारोंहून अधिक वड, पिंपळ, आंब्याची, शिसव, मोह आदी प्रकारची झाडे आहेत. येत्या सोमवारी वृक्ष समितीच्या बैठकीत २५० ऐवजी २०० झाडे टप्प्या टप्प्याने तोडण्याचा प्रस्ताव ठेवण्यात येणार असल्याचे बोलले जाते. रेल्वेची अडवणूक केली तर ते आपले रेल्वेशी संबंधित प्रकल्प अडकून ठेवतील, अशी भीती पालिकेकडून लोकप्रतिनिधींना घालण्यात येते. आयुक्त मधुकर अर्दड या झाडांविषयी काय भूमिका घेतात याकडे वृक्षप्रेमी नागरिकांचे लक्ष आहे.
बारा बंगला पट्टा हा पूर्णपणे हिरवागार राहिला पाहिजे. या भागातील झाडे तोडण्यास नेहमी आपण विरोध केला. पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत बहुमताच्या जोरावर हे विषय मंजूर केले जातात. त्यामुळे तेथे आपले एकटय़ाचे काही चालत नाही. येणाऱ्या बैठकीत झाडे तोडण्याच्या प्रस्तावास आपण विरोध करणार आहोत.
– श्रीकर चौधरी, भाजप, नगरसेवक, चोळेगाव