ठाणे : ठाणेकरांसाठी अत्यंत महत्वाचा ठरणारा वडाळा ते गायमुख मेट्रो प्रकल्पातील घोडबंदर मार्गावरील चार स्थानकादरम्यांच्या मेट्रो मार्गिकेची चाचणी करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेली ही चाचणी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची मानली जात असतानाच, या कार्यक्रमादरम्यान भाजपच्या माजी नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. तर, शिंदेच्या सेनेचे माजी नगरसेवक फिरलेच नसल्याचे चित्र दिसून आले. विशेष म्हणजे, महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी (अजीत पवार) पक्षाचे नेते आणि कार्यकर्तेही येथे उपस्थित नसल्याचे दिसून आले.

मुंबई महानगरातील वाहतुक कोंडी, उपनगरीय रेल्वे मार्गावरील ताण कमी करण्यासाठी मेट्रो मार्ग ४ म्हणजेच वडाळा-घाटकोपर-कासारवडवली आणि मेट्रो मार्ग ४ अ म्हणजेच कासारवडवली ते गायमुख असा प्रकल्प उभारला जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत असलेल्या एमएमआरडीए विभागामार्फत या प्रकल्पाची उभारणी सुरू असून या प्रकल्पातील मार्गिकांची लवकराच लवकर चाचणी व्हावा यासाठी शिंदे हे आग्रही होते.

यातूनच अखेर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत घोडबंदर भागातील मार्गिकेवरील गायमुख जंक्शन, गायमुख गाव कासारवडवली, विजय गार्डन या चार स्थानकांदरम्यान मेट्रो मार्गिकेची चाचणी करण्यात आली असून या मार्गिकेवर डिसेंबर अखेरपर्यंत मेट्रो सेवा सुरू केली जाणार आहे. या चाचणीवेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, भाजपचे आमदार निरंजन डावखरे, शिवाजी पाटील हे उपस्थित होते.

ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मेट्रो मार्गिकांची चाचणी महत्वाची मानली जात होती. या निमित्ताने शिंदेची शिवसेना आणि भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजपच्या नेत्यांनी बॅनरबाजीही केली होती. परंतु कार्यक्रमाच्या ठिकाणी भाजपचे झेंडे दिसून आले. तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप लेले, प्रवक्ते सुजय पत्की, घोडबंदर भागातील भाजपचे माजी नगरसेवक मनोहर डुंबरे, अर्चना मणेरा, स्नेहा पाटील, कविता पाटील यांच्यासह ठाणे शहरतील नगरसेवक नारायण पवार, कृष्णा पाटील, नगरसेविका मृणाल पेंडसे, नंदा पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि काही कार्यकर्ते घोषणा देत होते.

तर, दुसरीकडे शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर, पदाधिकारी रवी घरत यापैकी कुणीच उपस्थित नव्हते. विशेष म्हणजे, शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख मिनाक्षी शिंदे आणि माजी नगरसेवक संजय भोईर हे सुद्धा घोडबंदर पट्टयातील नगरसेवक म्हणून ओळखले जातात. हे सुद्धा त्याठिकाणी फिरकले नाहीत. या प्रकारामुळे भाजपचे माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्तेही आश्चर्य व्यक्त करताना दिसत होते.