कल्याण-डोंबिवली शहरांचा पाणीपुरवठा येत्या आठवडय़ापासून पूर्वीसारखाच मंगळवार, शनिवार असा दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. शनिवार-रविवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती.
कल्याण-डोंबिवली शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात फक्त ५६ टक्के पाणीसाठा आहे. हा साठा जुलैपर्यंत वापरायचा असल्याने पाणीकपात अटळ असल्याचे लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत स्पष्ट केले. पालिका व एमआयडीसीने पाण्याचे योग्य नियोजन करून पाणीपुरवठा केला, तर जुलैपर्यंत धरणातील पाणीसाठा वापरता येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पालिकेचा पाणीपुरवठा गेल्या तीन महिन्यांपासून मंगळवार, शनिवार असा बंद ठेवण्यात येत होता. मात्र गेल्या महिन्यात शनिवार, रविवार सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांनी पाणीपुरवठा बंद ठेवावा, असे फर्मान लघुपाटबंधारे विभागाने काढले.

शनिवार, रविवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याने सोमवारी पालिका, एमआयडीसी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व अन्य संस्था एकाच वेळी नदीतून पाणी उचलू लागल्याने पाणीटंचाईच्या समस्या आणखी गंभीर होऊ लागल्या. त्यात गेले पाच दिवस कल्याण-डोंबिवली शहराला पाणीटंचाईचा तीव्र तडाखा बसला. ही गंभीर परिस्थितीत विचारात घेऊन लघुपाटबंधारे विभागाने यापूर्वीच्या नियोजनाप्रमाणे पाणी सोडण्यात यावे, असे आदेश दिले आहेत.