Kalyan Receptionist Assault Case 2nd Twist : कल्याण पूर्वेतील मलंगगड रस्त्यावरील नांदिवली तर्फ गावातील डॉ. अनिकेत पालांडे यांच्या श्री बाल चिकित्सालय या रुग्णालयामध्ये सोमवारी (२१ जुलै) संध्याकाळी स्वागत कक्षातील एका तरुणीला (रिसेप्शनिस्ट) गोकुळ झा नावाच्या एका तरूणाने लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली, तसेच तिला फरफटत नेलं. गोकुळविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून बुधवारी (२३ जुलै) त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

गोकूळ झा रुग्णालयातील रिसेप्शनिस्टला (स्वागतिका) मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आरोपीविरोधात संताप उफाळून आला होता. मात्र, रुग्णालयातील आणखी एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आल्यानंतर या प्रकरणाला नवं वळण मिळालं. या तरुणीनेच आधी आरोपीच्या वहिणीच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ समोर आला. त्यामुळे संतापलेल्या गोकुळने तरुणीला मारहाण केल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, आता पीडित तरुणीने माध्यमांसमोर येत संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.

पीडितेने म्हटलं आहे की आरोपीने आधी तिच्या मानेवर लाथ मारली होती. त्यानंतर आरोपीच्या नातेवाईकांनी त्याला रुग्णालयातून बाहेर नेलं. त्यानंतर तरुणीने आरोपीच्या वहिणीच्या कानशिलात लगावली. त्याच संतापातून आरोपीने पुन्हा रुग्णालयात घुसून तरुणीला बेदम मारहाण केली.

नेमकं काय घडलं?

पीडित तरुणी म्हणाली, “डॉक्टरांनी १० मिनिटं रुग्णांना आत पाठवू नको असं मला सांगितलं होतं. काही एमआर त्यांच्या भेटीसाठी डॉक्टरांच्या कक्षात गेले होते. मात्र आरोपी सतत येरझऱ्या मारत होता. डॉक्टरांच्या कक्षात जाण्याचा प्रयत्न करत होता. मी त्यांना म्हटलं की ‘दादा तुमचा नंबर आलेला नाही. काही वेळ थांबा’. त्यानंतर तो मला म्हणाला, तू इथे बसून काय करतेयस. तसेच डॉ़क्टरांशी उद्धटपणे बोलत होता. मी त्याला म्हटलं तू असं कसं काय बोलू शकतोस. त्याचवेळी तो मला आई-बहिणीवरून शिव्या देत होता.

“त्याने मला शिव्या दिल्यावर मी त्याला म्हटलं तुला शिस्त नाही का? तू काय बोलतोयस तुला कळतंय का? त्यानंतर त्याने माझ्या मानेवर लाथ मारली. त्यानंतर त्याच्याबरोबर आलेल्या एका महिलेने त्याला बाहेर नेलं. त्याने लाथ मारल्यावर मलाही राग आला आणि रागाच्या भरात मी त्याच्या वहिणीच्या कानशिलात लगावली. काही वेळाने आत परत रुग्णालयात घुसला आणि त्याने मला मारहाण केली. त्या मारहाणीचा व्हिडीओ तुम्ही सर्वानी पाहिलाच आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आरोपी गोकुळ झा याला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.