कल्याण : पालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात गेल्या आठवड्यात मण्यार जातीचा साप चावून एक बालिका आणि एक तरूणी यांचा मृत्यू झाला. या दोघींना उपचारासाठी नातेवाईकांनी पालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. या दोघींवर उपचार करण्याची प्राथमिक जबाबदारी रात्रपाळीतील डाॅक्टर संजय जाधव यांची होती. या दिवशी रात्री कर्तव्य असताना ते रुग्णालयात गैरहजर होते. त्यामुळे या दोघींच्या मृत्यु प्रकरणाला जबाबदार धरून आयुक्त अभिनव गोयल यांनी त्वचा रोग विशेषज्ञ डाॅ. संजय जाधव यांना सोमवारी निलंबित केले.

पालिकेच्या आरोग्य विभागात गलथान कारभार आहे. वरिष्ठांचे कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर प्रभावी नियंत्रण नसल्याने आरोग्य विभागातील काही कर्मचारी, डाॅक्टर मनमानीने वागत आहेत. त्याचा फटका रुग्ण सेवेतून रुग्णांना बसत आहे. अशाच प्रकारे आरोग्य मुख्यालयातील एक शासनाकडून आलेल्या वतनदार कर्मचाऱ्याची वतनदारी वाढली आहे. त्याची सेवा खंडित करण्याच्या निर्णयापर्यंत प्रशासन आले आहे. तर एका कर्मचाऱ्याने ऑफिस ऑफ प्राफिट कायद्याचा भंग केला आहे. त्यामुळे हे दोन्ही कर्मचारी आता कारवाईच्या फेऱ्यात आहेत.

शास्त्रीनगर रुग्णालय नेहमीच रुग्ण सेवेच्या बाबतीत चर्चेत राहिले आहे. काही महिन्यापूर्वी या रूग्णालयातील दोन डाॅक्टर निलंंबित करण्यात आले होते. आता डाॅ. जाधव हे निलंबित होणारे तिसरे कर्मचारी आहेत. खंबाळपाडा येथील प्राणवी भोईर (वय ४), कुमारी श्रृती ठाकुर (२४) यांना मण्यार जातीचा विषारी साप गेल्या आठवड्यात चावला होता. कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी शास्त्रीनगर रुग्णालयात आणले होते. रुग्णालय प्रशासनाने त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू केले होते. परंतु, ही घटना घडत असताना शास्त्रीनगर रुग्णालयात रात्रपाळीसाठी डाॅ. संजय जाधव यांची नियुक्ती होती. ते या घटनेच्यावेळी या दोघींवरील उपचारासाठी हजर नव्हते.

प्राणवीची तब्येत रात्री खालावल्याने तिला आणि श्रृती यांना ठाणे नागरी रूग्णालयात नेण्याचा निर्णय घेण्यात आला. प्राणवीची रुग्णालयाच्या प्रवेशव्दारात मरण पावली. त्यानंतर श्रृतीचा मृत्यू झाला. या सगळ्या प्रकरणाला शास्त्रीनगर रुग्णालयाचा गलथानपणा जबाबदार असल्याचा आरोप करत दोषी डाॅक्टरांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सत्यवान म्हात्रे यांनी केली होती.

कुटुंबीयांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. दीपा शुक्ला यांच्या दालनात ठिय्या मांडला होता. डाॅ. शुक्ला यांनी याप्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. आयुक्तांनी याप्रकरणी शास्त्रीनगर रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांना खुलासा देण्याचे आदेश दिले होते. मुख्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. योगेश चौधरी यांच्यासह यावेळी प्रत्येक कर्मचारी सजग झाल्याने वस्तुस्थिती दर्शक खुलासे आयुक्तांना दिले. त्यामुळे या कचाट्यात डाॅ. जाधव सापडले. रात्रपाळीत कर्तव्यावर हजर न राहता कर्तव्यात कसूरपणा केल्याचा ठपका डाॅ. जाधव यांच्यावर ठेवत आयुक्तांनी त्यांना निलंबित केले.

गेल्या सात महिन्यांपासून सुस्तावलेल्या आरोग्य विभागाची साफसफाई मोहीम आयुक्तांनी सुरू केल्याने रुग्ण, नातेवाईकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. शासनाने कर्तव्यकठोर वैद्यकीय आरोग्य अधिकारी पालिकेला देण्याची मागणी नागरिक करत आहेत.