कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेतील वाद्ग्रस्त विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगररचना विभागातील सर्वेअर बाळू बहिराम, आरेखक राजेश बागुल या कर्मचाऱ्यांना बाजारपेठ पोलिसांनी गुरुवारी रात्री चौकशीनंतर अटक केली. नगररचना विभागात मागील १५ वर्षांपासून ठराविक कर्मचारी एकाच पदस्थापनेवर कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या यापूर्वी आयुक्तांच्या आदेशावरून बदल्या झाल्या होत्या. आयुक्त बदली होताच पुन्हा हे कर्मचारी साहाय्यक संचालक नगररचना, सामान्य प्रशासन विभागाशी संगनमत करून नगररचना विभागात दाखल झाले आहेत. नगररचना विभागातील एका कर्मचाऱ्याविरुद्ध नवी दिल्लीतील राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे एका जागरूक नागरिकाने दावा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण?

डोंबिवली पश्चिमेत महाराष्ट्रनगरमध्ये विनोद बिल्डर्सचे मालक विनोद किसन म्हात्रे (रा. कांचनवाडी, महाराष्ट्रनगर), रमेश कचरू म्हात्रे, वास्तुविशारद धीरज पाटील यांनी नगररचना विभागात सहा माळ्यांच्या इमारतीचा आराखडा जुलै २०२१ मध्ये मंजुरीसाठी दाखल केला होता. आराखडा दाखल करताना विनोद बिल्डर्सने भूमिअभिलेख विभागाचा बनावट मोजणी नकाशा इमारत आराखड्या सोबत सादर केला होता. या आराखड्यानुसार खासगी जमिनीलगतची गुरचरणीची सहा गुंठे जमीन खासगी मालकीत दाखविण्यात आली होती. आराखडा मंजुरीपूर्वी सर्वेअर बाळू बहिरम, आरेखक राजेश बागुल यांनी विनोद बिल्डर्सच्या जमिनीचा प्रत्यक्ष स्थळ सर्वे करून जमिनीचे अचूक रेखांकन करणे आवश्यक होते. या प्रस्तावात गुरचरण जमिनीचा समावेश आहे, नऊ मीटरचा पोहच रस्ता येथे उपलब्ध नाही, हे सर्वेअरने नगररचना विभागाच्या निदर्शनास आणले नाही. विकासकाने दाखल केलेला प्रस्ताव योग्य असल्याचा शेरा लिहून बहिराम, बागुल यांनी प्रस्ताव तत्कालीन नगररचनाकार राजेश मोरे, अभियंता ज्ञानेश्वर आडके यांच्याकडे पाठविला. तत्कालीन साहाय्यक संचालक मारुती राठोड यांनी विनोद बिल्डर्सचा प्रस्ताव योग्य समजून मंजूर केला.

हेही वाचा – परीक्षांच्या काळात तरी लोकल वेळेत चालवा; रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी, विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती

वादाला प्रारंभ

विकासकाने सहा माळ्यांची इमारत बांधली. दरम्यानच्या काळात पालिकेची परवानगी न घेता पाच बेकायदा मजले या अधिकृत इमारतीवर बांधले. या बेकायदा मजल्यांप्रकरणी, या इमारतीसाठी सहा गुंठे गुरचरण जमिनीचा वापर केला आहे, अशी तक्रार माजी नगरसेवक रमेश पद्माकार म्हात्रे, आमदार गणपत गायकवाड यांनी आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. या प्रकरणाची चौकशी झाली. भूमि अभिलेख विभागाने विनोद बिल्डर्सने पालिकेत दाखल केलेला नकाशा आम्ही दिला नसल्याचे स्पष्ट केले. अधिकृत इमारतीवर पाच बेकायदा माळे बांधल्यावर या बांधकामाला परवानगी देण्याचा सुधारित प्रस्ताव विकासकाने पालिकेत दाखल केला. बोगस मोजणी नकाशाच्या आधारे या इमारतीला परवानगी देण्यात आल्याने माजी आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांच्या आदेशावरुन साहाय्यक संचालक नगररचना दिशा सावंत यांनी विनोद बिल्डर्सची बांधकाम परवानगी रद्द केली. याप्रकरणी नगररचनाकार शशिम केदार यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात विकासक विनोद म्हात्रे, वास्तुविशारद यांच्या विरुद्ध बोगस कागदपत्रांंसंबंधी तक्रार केली होती. पोलीस चौकशीत सर्वेअर बहिराम, बागुल दोषी आढळले.

हेही वाचा – परीक्षांच्या काळात तरी लोकल वेळेत चालवा; रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी, विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशाच प्रकारे ह प्रभागात राहुलनगरमध्ये सुदाम रेसिडेन्सी, रमाकांत आर्केड बेकायदा इमारती समीर भगत, चेतन म्हात्रे यांनी बांधल्या आहेत. ठाकुरवाडीत प्रकाश गोठे, शंकर ठाकूर यांच्या बेकायदा इमारती आहेत.