३० गुंठे जागा हडप करण्याचा डाव;पोलीस पत्नीकडून गैरकारभार उघड
वसई पोलीस ठाण्याचे दोन नकाशे बनल्याची धक्कादायक बाब एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने उघडकीस आणली आहे. एका खासगी व्यक्तीने वसई पोलीस ठाण्याचा नवीन नकाशा बनवून त्यातून ३० गुंठे जागाच बेपत्ता केली आहे. हा नवीन नकाशा कशासाठी बनवला त्याचे उत्तर आता कुणीच देत नाही. हा नवीन नकाशा म्हणजे जागा हडप करण्याचे षड्यंत्र असल्याचा आरोप पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केला आहे.
वसई पोलीस ठाण्याच्या मालकीची १ हेक्टर ८४ गुंठे जागा आहे. या जागेचा सातबारा वसई पोलीस ठाण्याच्या नावे आहे. या ठिकाणी पोलीस ठाणे आणि पोलीस कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. यातील काही जागेवर अतिक्रमण झालेले आहे. मात्र खासगी सव्र्हेअरकडून या जागेचा दुसरा नकाशा बनवून त्यात ३० गुंठे जागा बेपत्ता करण्यात आली असल्याचा धक्कादायक आरोप पोलीस नाईक शशिकांत कांबळे यांच्या पत्नी सुकेशिनी कांबळे यांनी केला आहे. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. पोलीस ठाण्याचा नकाशा सार्वजनिक बांधकाम खात्याने २०१३मध्ये बनवला होता. मात्र एका व्यक्तीने हा नकाशा पोलीस ठाण्यातून नेला आणि सव्र्हे करून नवीन नकाशा बनविल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. या नवीन नकाशात ३० गुंठे जागा बेपत्ता केली आहे. वसई पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांच्या संगनमताने हे काम झाले असून पाटील यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी या अर्जात आहे.
अभिलेख कार्यालयाकडून सर्वेक्षण
पोलिसांनी वसईच्या भूमी अभिलेख कार्यालयाला पत्र लिहून तात्काळ नव्याने जागेची मोजणी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अशी मोजणी करण्यासाठी खुद्द जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी लागते. पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांनी वैयक्तिक नऊ हजार रुपये मोजणीचे भरले असून लवकरच ही मोजणी होणार आहे.
याबाबत तक्रार आली आहे. आम्ही मोजणीसाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडे विनंती करण्यासाठी प्रांत अधिकाऱ्यामार्फत पत्र दिले आहे. ती मोजणी झाल्यानंतर नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.
– योगेश कुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, वसई
एका व्यक्तीस पोलिसांसाठी दोन खोल्या बांधून देण्याची विनंती केली होती. परंतु नकाशा घेऊन जा, असे कुणालाच सांगितले नव्हते. नवीन नकाशा ही भानगड मला माहीत नाही.
– श्रीकृष्ण कोकाटे, तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक, वसई
एका सर्वसामान्य नागरिकाने सव्र्हेसाठी नकाशा नेला होता. पण त्याला नकाशा घेऊन जा, असे आदेश माझ्या वरिष्ठांनी दिले होते. नवीन नकाशा मी पाहिलेला नाही. जागा हडप करण्याचा माझ्यावरचा आरोप चुकीचा आणि खोटा आहे.
– संपतराव पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वसई