Crime news : ठाणे : दोन वेगवेगळ्या हत्या प्रकरणात ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात (सेंट्रल जेल) कैदेत असलेल्या विजय मिश्रा आणि आरीफ अन्वर अली या दोघांनी ‘प्लान’ रचून कारागृहातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु कारागृहातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने या दोघांना पुन्हा ताब्यात घेणे शक्य झाले. या दोन्ही कैद्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न करताना कारागृहातील कर्मचाऱ्यांच्या नाकी नऊ आणले होते. कैद्यांविरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ठाणे मध्यवर्ती कारागृहात शेकडो आरोपी बंदी आहेत. यातील आरीफ अन्वर अली याच्याविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात तर विजय याच्याविरोधात पालघर जिल्ह्यातील वाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल आहे. त्यांना सुतारकाम विभागात काम दिले जाते. ९ सप्टेंबरला कारागृह विभागातील कर्मचाऱ्याने कारागृहातील मोकळे भाग, स्वच्छतागृह, तटबंदीजवळील परिसराची पाहाणी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी आरीफ आणि विजय हे दोघेही स्वच्छतागृहात लपून बसल्याचे आढळून आले. कर्मचारी तात्काळ त्यांना तेथून हटकून बाहेर नेऊ लागला. काही अंतर बाहेर आले असताना आरीफ हा पळून जाऊ लागला.
त्यामुळे कर्मचाऱ्याने त्याचा पाठलाग सुरु केला असता, त्याच संधीचा गैरफायदा घेत विजय देखील विरुद्ध दिशेने पळू लागला. विजय हा तटबंदीच्या दिशेने जाऊ लागल्याने कर्मचाऱ्याने सुरुवातीला विजयचा पाठलाग सुरु केला. विजय हा सुतारकाम विभागाच्या खिडकीच्या ग्रीलच्या साहाय्याने छतावर चढला होता. कर्मचाऱ्याने शिटी वाजवून आणि वाॅकीटाॅकीच्या साहाय्याने सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सतर्क केले.
असे घेतले ताब्यात
दुसरीकडे आरीफ हा देखील सीसीटीव्ही वाहिनीच्या साहाय्याने बुरुजावर चढला होता. त्याने पलिकडील दिशेला उडी मारली. प्रसंगावधान राखत त्या कर्मचाऱ्याने किल्लीच्या मदतीने मुख्य प्रवेशद्वार उघडले. त्यानंतर इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने आरीफला ताब्यात घेण्यात आले. तोपर्यंत विजय हा एकाठिकाणी लपून बसला होता. कारागृहातील पथकाने त्याचा दवाखाना विभागाजवळ शोध घेऊ लागले. त्यावेळी तो वेलींमध्ये लपून बसल्याचे आढळून आले. पथक त्याला ताब्यात घेत असताना त्याने हातातील पत्र्याच्या तुकड्याने स्वत:ला जखमी करुन घेतले. पथकाने त्याच्या हातातील पत्र्याचा तुकडा काढला आणि त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी दोघांविरोधात कारागृहातील शिपायाने तक्रार दाखल केली असून त्यांच्याविरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या दोन्ही कैद्यांनी कारागृह प्रशासनाच्या नाकी नऊ आणले होते.