ठाणे : ठाणे मध्यवर्ती कारागृहातील दोन कैद्यांना मौज करण्यासाठी मोकाट सोडणाऱ्या ठाणे शहर पोलीस दलातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. पोलीस हवालदार गिरीश पाटील आणि पोलीस हवालदार योगेश शेळके अशी दोघांची नावे असून त्यांच्या बडतर्फीचे आदेश ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी काढले.

ठाणे मध्यवर्ती कारागृहातील सात कैद्यांना ४ ऑगस्ट या दिवशी तपासणीसाठी कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात येत होते. या कैद्यांना नेण्यासाठी ठाणे शहर पोलीस दलातील मुख्यालयातील कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती.

सात कैद्यांपैकी रमेशभाई पांबर आणि करण ढबालीया या दोन कैद्यांना एका रिक्षातून बाहेर हॉटेलात जेवणासाठी आणि मौजमजेसाठी नेण्यात आल्याची बाब चौकशीत उघड झाली होती. त्यानंतर याप्रकरणात ११ पोलीस कर्मचाऱ्यांचे मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त प्रमोद बनसोड यांनी निलंबन केले होते.

याप्रकरणाची चौकशी सुरु असताना, अहवालाच्या आधारेच निलंबित केलेल्या ११ पैकी गिरीश पाटील आणि योगेश शेळके या दोघांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. ११ पोलीस कर्मचाऱ्यांच्या या कृत्यामुळे ठाणे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली आहे.