कल्याण: जयनगर ते मुंबई कुर्ला टर्मिनस दरम्यान बुधवारी पती-पत्नीचे जोडपे प्रवास करत होते. प्रवासात पत्नीचा पैशाचा बटवा हरवला. हा बटवा सहप्रवासी असलेल्या दोन तरुणांनी चोरल्याचा संशय व्यक्त करुन पतीने दोन्ही तरुणांना कल्याण स्थानकात उतरवुन त्यांना भिवंडी येथील एका घरात डांबून ठेवले. या दोन्ही तरुणांच्या घरी संपर्क करुन ५० हजार रुपयांची खंडणी मागितली.
अझर असे आरोपीचे नाव आहे. सज्जाद शेख (२१), सजिज शेख (१८) असे तक्रारदारांचे नाव आहे. तक्रारदार सजिज आणि आरोपी अझर हे बुधवारी पवन एक्सप्रेसमधून मुंबईला येण्यासाठी एकत्र प्रवास करत होते. प्रवासात अझरच्या पत्नीचा पैशाचा बटवा हरवला. तो डब्यात शोधूनही सापडला नाही. हा बटवा सहप्रवासी सजिज, सज्जाद यांनीच चोरुन तो बाहेर फेकल्याचा संशय व्यक्त केला. आम्ही पैसे चोरले नाहीत असे सतत सांगुनही अझर ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.
हेही वाचा >>> टी-८० युध्दनौकेचा मुंबईतून कल्याणच्या दिशेने प्रवास, नौदल संग्रहालयात होणार विराजमान
अझरने दादागिरी करत सज्जाद, सजिज यांना कल्याण रेल्वे स्थानकात उतरविले. त्यांना रिक्षाने भिवंडी येथे नेऊन एका घरात कोंडून ठेवले. या दोन्ही तरुणांच्या नातेवाईकांना संपर्क करुन अझरने ५० हजार रुपयांची मागणी केली. मुलांचे अपहरण झाल्यावर नातेवाईक कल्याण येथे आले. त्यावेळी आरोपीने त्यांना मी कुर्ला येथे असल्याचे सांगितले. कुर्ला येथेही अझर नव्हता. तो खरी माहिती देत नाही म्हणून नातेवाईकांनी नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे दोन्ही तरुणांची भिवंडीतील एका घरातून सुटका केली. आरोपी अझरला अटक करुन गुन्हा कल्याण लोहमार्ग पोलिसांकडे तपासासाठी वर्ग केला. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे करत आहेत.