raj thackeray : uddhav thackeray: ठाणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जस-जशा जवळ येऊ लागल्या. तसे ठाकरे बंधू एकत्र येणार का अशी चर्चा रंगू लागली आहे. ठाकरे ब्रँड टिकविण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढविण्याची गरज असल्याचे मत पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते करत आहेत.

मुंबई, ठाणे महापालिका निवडणूका अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरीही मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यामध्ये बैठकांचे सत्र होत आहे. त्यातच आज ठाण्यातील मनसे आणि ठाकरेंचे नेते एकत्र येणार आहेत. ठाकरेंच्या शिवेसनेचे नेते राजन विचारे आणि मनसेचे नेते अविनाश जाधव एकत्रित पत्रकार परिषद घेत असून ते काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर मुंबई, ठाणे, नाशिकसह महत्त्वाच्या शहरामधील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. मुंबई महानगरातील मुंबई आणि ठाणे महापालिका महत्त्वाच्या आहेत. या दोन्ही महापालिकांवर शिवसेनेची सत्ता होती.

शिवसेनेची सत्ता पहिल्यांदा आली ती ठाणे महापालिकेत. त्यामुळे मुंबई प्रमाणे ठाणे महापालिका देखील शिवसेनेसाठी तितकीच महत्त्वाची आहे. परंतु आता शिवसेनेची दोन शकले पडली आहे. त्यामुळे मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने एकत्र यावे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवावी अशी मागणी त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते करत आहेत. तर दुसरीकडे भाजपकडून ठाकरे ब्रँडची खिल्ली उडविली जात आहे.

ठाण्यात ठाकरे बंधू एकत्र येणार का?

– गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेत्यांमध्ये सातत्याने बैठका होत आहेत. काही दिवसांपूर्वीच आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी एक बैठक झाली होती. या बैठकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राजन विचारे, मनसेचे नेते अविनाश जाधव आणि काँग्रेसचे विक्रांत चव्हाण उपस्थित होते.

राजन विचारे आणि अविनाश जाधव आज एकत्र – ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राजन विचारे आणि मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदाच त्यांची ही पत्रकार परिषद एकत्रितरित्या होत आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेत दोन्ही पक्षाचे नेते काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकत्रित पत्रकार परिषद घेतली जात असल्याने या पत्रकारपरिषदेकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.