शिवसेनेकडून जयस्वाल यांचा विशेष सत्कार

ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावर हल्ल्याचा कट होता, असा गौप्यस्फोट करत महापालिका निवडणुकांच्या प्रचारात शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न खुद्द मुख्यमंत्र्यांकडून झाला असला तरी शिवसेनेने मात्र सोमवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जयस्वाल यांचा विशेष सत्कार करत साऱ्यांनाच धक्का दिला. जयस्वाल यांनी केलेल्या कामामुळे शिवसेनेला उभारी मिळाली, असे वक्तव्य करीत उद्धव यांनी या वेळी आयुक्तांचे विशेष कौतुकही केले. विशेष म्हणजे, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आग्रहाने जयस्वाल यांचा सत्कार घडवून आणल्याने महापौर निवडीपेक्षा महापालिका वर्तुळात सोमवारी याच सोहळ्याची चर्चा अधिक रंगली होती.

ठाणे महापालिका आयुक्त म्हणून गेल्या वर्ष-दीड वर्षांत जयस्वाल यांनी शहरात विकासकामांचा अक्षरश: धडाका लावला आहे. बेकायदा बांधकामांवर कारवाई, रस्त्यांचे रुंदीकरण, नव्या प्रकल्पांची आखणी करीत या काळात जयस्वाल सातत्याने चर्चेत राहिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील अधिकारी म्हणून जयस्वाल यांची ओळख असली तरी त्यांनी केलेल्या कामाचे श्रेय भाजपच्या स्थानिक नेत्यांना घेता आले नाही. सत्ताधारी शिवसेनेने मात्र निवडणूक काळाच्या आधीपासूनच जयस्वाल यांनी आखलेल्या विकास प्रकल्पांचा वातावरणनिर्मितीसाठी पुरेपूर उपयोग करून घेतला. शिवसेनेने जाहीर केलेल्या वचननाम्यातही जयस्वाल यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या काही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा समावेश करण्यात आला होता. या सर्वाची पुरेपूर कल्पना आल्याने भाजपने प्रचारकाळात जयस्वाल यांनी केलेल्या विकासाचे श्रेय पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयस्वाल यांना आपणच ठाण्यात पाठविल्याचा उल्लेख करताना त्यांनी केलेल्या विकासाच्या कामात अडथळे उभे करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली होती. तसेच पारदर्शकतेचा आग्रह धरणाऱ्या जयस्वाल यांच्यावर हल्ला करण्याचा कट होता, असा गौप्यस्फोटही मुख्यमंत्र्यांनी केला होता. मुख्यमंत्र्यांच्या आरोपांचे खंडन करताना शिवसेना जयस्वाल यांच्या पाठीशी उभी राहिली म्हणून ठाण्याचा विकास शक्य झाला, असा दावा शिवसेनेचे नेते करीत होते. त्यामुळे या प्रचारात जयस्वाल नेमके कुणाचे यावरून दोन्ही पक्षांमध्ये कलगीतुरा रंगल्याचे दिसून आले.

आयुक्तांवर कौतुकाचा वर्षांव

महापौर निवडणुकीनिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोमवारी ठाणे महापालिकेत येणार असल्याने त्यांची आयुक्तांविषयी भूमिका काय असेल याविषयी येथील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात उत्सुकतेचे वातावरण होते.

महापौर आणि उपमहापौरांचा सत्कार केल्यानंतर पालकमंत्री एकनाथ िशदे यांनी या वेळी उपस्थित असलेल्या जयस्वाल यांच्या सत्काराचा आग्रह धरला आणि उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. उद्धव यांनीही जयस्वाल यांचा सत्कार करत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षांव केला. ठाणे महापालिकेस नेहमीच चांगले अधिकारी लाभले असून जयस्वाल हेदेखील त्यापैकी आहेत. त्यांनी केलेल्या विकासकामांमुळे आम्हाला उभारी मिळाली, असे उद्धव म्हणाले. शिवसेनेने ठाण्याच्या विकासाचे जे आश्वासन दिले आहे त्यास जयस्वाल निश्चित आकार देतील, असेही ते या वेळी म्हणाले.