प्रचाराकरिता गांधी विचार, दाखवण्यासाठी साबरमती आणि निवडणुका संपल्या की बारामतीचा जप हे सुरू करतात. निवडणुका आल्या की यांची दिल्लीची सगळी पितरं खाली उतरतात. आता तर यांनी सत्ता काबीज करण्यासाठी होमहवन सुरू केले आहेत. जे भगव्याला किंमत देत नाहीत, त्यांना देव पावत नाही आणि स्वप्ने साकार होत नाहीत. यांचा आता होमहवन पक्ष झाला आहे, अशी सडकून टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज डोंबिवली येथे झालेल्या निवडणूक प्रचारसभेत केली.
उद्धव यांनी मनसेचा नामोल्लेख या वेळी टाळला. पंतप्रधानांच्या कार्यपद्धतीवर ठाकरे यांनी टीका केली. शिवसेनेची जाहीर सभा डोंबिवलीत फडके रस्ता येथे होती. ‘‘पार्लमेंट ते पंचायतच्या आता जाहिराती केल्या जात आहेत. पण यांची पार्लमेंटमध्ये झालेली पंचाईत सामान्य पाहत आहेत. स्वपक्षातील माजी मंत्री पंतप्रधान कार्यालय कसे दुबळे झाले हे उघडपणे सांगत आहेत. वाजत-गाजत सुरू झालेल्या जनधन योजनेचे काय झाले? टाकला का यांनी तुमच्या खात्यात पैसा? दुष्काळात जनता, शेतकरी होरपळत आहे. डाळीचे भाव गगनाला भिडले आहेत. शिवसेनेने जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी स्थानिक फळी स्थानिक पातळीवर कार्यरत असते,’’ असे उद्धव म्हणाले. शहरातील जनता स्मार्ट आहे. त्यामुळे चूक, बरोबर त्यांना कळते. पालिकेत ज्या नागरी सुविधा दिल्या आहेत, काही प्रस्तावित आहेत, त्याच स्मार्ट आहेत, असे सांगून ठाकरे यांनी स्मार्ट सिटीची खिल्ली उडवली. बिहारमधील राजदला जादूटोणा पक्ष म्हणणारे भाजप सत्तेसाठी हवन करीत आहे; याला काय म्हणणार, असा सवाल त्यांनी केला.