उल्हासनगर : शेअर बाजारात अधिकच्या परताव्याचे आमिष दाखवून शेअर खरेदी करण्यास भाग पाडून तब्बल ५ कोटी ७७ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. एका ७३ वर्षीय व्यक्तीने याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. बदलापुरातही अशाच प्रकारे ८ लाख २३ हजारांचा गंडा घालण्यात आला आहे. उल्हासनगरातील हा आठवडाभरातील तिसरा गुन्हा असून बदलापुरातील दुसरा गुन्हा आहे.

ऑनलाईन, व्हाट्सअपद्वारे किंवा विविध माध्यमातून संपर्क करून गुंतवणुकीच्या नावाखाली सर्वसामान्यांना कोट्यावधींचा गंडा घातला जातो आहे. याची अनेक प्रकरणे समोर येत असतानाही यात फसवणुकीचे प्रकार कमी होताना दिसत नाहीत. यात महिलांसह, ज्येष्ठ नागरिकही चोरट्यांच्या जाळ्यात अडकत आहेत. दोनच दिवसांपूर्वी असाच ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार समोर आलेला असताना आता तब्बल ५ कोटींच्या फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे.

उल्हासनगरातील विष्णु कोटवानी या ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरांनी समाज माध्यमातून संपर्क साधला. त्यांना शेअर आणि आयपीओ मध्ये गुंतवणूक केल्यास त्यातून अधिकचा परतावा मिळेल असे आमिष दाखवले. त्यानंतर त्यांना बीएसएसएल आणि आरपीएमटीए हे दोन ऍप मोबाईलमध्ये डाऊनलोड करावयास सांगितले होते. त्यानंतर त्यांना वेळोवेळी त्या माध्यमातून पैसे भरण्यास सांगण्यात आले. फिर्यादींना यात ५ कोटी ७७ लाख २ हजार रूपये गुंतवले. मात्र यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार आशिष कुमार, इशिता कपू आणि अद्विक शर्मा या तीन व्यक्तींविरूद्ध उल्हासनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतक्या मोठ्या रकमेच्या फसवणुकीमुळे पोलीसही आश्चर्यचकीत झाले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

असाच काहीसा प्रकार बदलापूर शहरातही समोर आला आहे. बदलापुरात राहणाऱ्या एका व्यक्तीला शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी कुवेरा ओटीसी फॅक्ट ट्रेडींग या खाते उघडण्यास सांगण्यात आले. त्यासाठी फिर्यादींना लिंक पाठवण्यात आली. त्यांनाही अतिरिक्त परताव्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यामुळे फिर्यादी यांनी ८ लाख २३ हजार रूपयांची गुंतवणूक केली. मात्र त्यावर कोणताही परतावा मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी बददलापूर पूर्व पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. नागरिकांनी अशा गुंतवणुकीच्या पर्यायांची विश्वासार्हता तपासावी असे आवाहन तज्ज्ञांकडून केले जाते आहे.