कल्याण : भारतात राहण्याची कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसताना भारतात घुसखोरी करून डोंबिवली जवळील शिळफाटा रस्त्यावरील कोळेगावात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशी महिलांना उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी शिताफीने अटक केली आहे.

शिळफाटा रस्त्यावरील काटई नाक्याच्या बाजुला कोळेगाव आहे. कोळेगावातील कृष्णा मंदिराच्या मागे अनिल पाटील चाळीत या तीन महिला राहत होत्या. कोळेगावात बांगलादेशी महिला राहत असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांना मिळाली होती. त्यांनी तात्काळ एक पथक स्थापन केले. या महिला कोळेगावात राहतात का, त्या कोणत्या व्यवसाय करतात याची पहिले गुप्त माहिती काढली.

या माहितीची खात्री झाल्यानंतर उल्हासनगर गुन्हे शाखेचे पथक कोळेगावात दाखल झाले. त्यांनी अनिल पाटील चाळीत राहत असलेल्या रोजीना सुकूल अली (२९), तंजिला खेतून रज्जाक शेख (२२), शेफाली बेगम शेख (२३) यांना अटक केली. त्या बांग्लादेशातील अभयनगर उपजिल्ह्यातील खुलना विभागातील रहिवासी आहेत.

हेही वाचा : डोंबिवलीत चोरी करत असताना चोरट्याला नागरिकांनी पकडले

पोलिसांनी त्यांच्याकडे भारतात निवास करण्यासाठी लागणारी पारपत्र, प्रवासी वैध कागदपत्रे यांची मागणी केली. ती त्यांच्याकडे नव्हती. भारत-बांग्लादेश सीमेवरून चोरून लपून या महिलांनी भारतात घुसखोरी करून प्रवेश मिळविला असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. या महिलांविरुध्द विदेशी व्यक्ति अधिनियमाने गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलांची अधिक चौकशी करण्यासाठी त्यांना मानपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी, उपनिरीक्षक प्रवीण खोचरे, हवालदार प्रकाश पाटील, शेखर भावेकर, कुसूम शिंदे, मनोरमा सावळे, विक्रम पाटील, प्रसाद तोंडलीकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.