उल्हासनगर : तीन वर्षांपूर्वी कार्यकाळ संपलेल्या उल्हासनगर महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना बुधवारी जाहीर करण्यात आली. यापूर्वी २०२२ मध्ये जाहीर केलेल्या प्रभाग रचनेत ३० प्रभाग तर ८९ सदस्यसंख्या होती. यंदाच्या प्रारूप प्रभाग रचनेत २०१७ प्रमाणेच २० प्रभाग असून ७८ सदस्यसंख्या आहे. यातील १८ प्रभाग चार सदस्य असलेले तर दोन प्रभाग तीन सदस्य असलेले आहेत. १५ सप्टेंबरपर्यंत या प्रारूप प्रभाग रचनेबाबत सूचना आणि हरकती सादर करता येणार आहेत.

उल्हासनगर महापालिकेची निवडणूक यापूर्वी २०१७ वर्षात झाली होती. आठ वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत सदस्यसंख्या ७८ तर प्रभागांची संख्या २० इतकी होती. त्यानंतर २०२२ मध्ये पालिकेचा कार्यकाळ संपुष्टात आला. त्यावेळी तत्कालीन आयुक्तांनी प्रारूप प्रभाग रचना, अंतिम प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत काढली होती. त्यावेळी उल्हासनगर महापालिकेत तीन सदस्यीय असे ३० प्रभाग तयार करण्यात आले होते. त्यात २९ प्रभाग तीन सदस्यीय़ तर एक प्रभाग दोन सदस्यीय होता. त्यानंतर पालिका प्रशासनाने अंतिम प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर आरक्षण सोडतही काढली होती. मात्र त्यात त्रुटी राहिल्याने काही प्रभागात संपूर्ण प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाला होता. त्यावरून पालिकेला पुन्हा आरक्षण सोडत काढण्याचे आदेश दिले होते.

त्यानंतर पुन्हा निवडणूक प्रक्रिया थंडावली. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनानुसार पालिका प्रशासनांनी पुन्हा एकदा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. उल्हासनगर महापालिकेने बुधवारी उल्हासनगर महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली. त्यानुसार शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेप्रमाणे ५ लाख ६ हजार ९८ इतकी आहे. तर शहरातील एकूण सदस्यांची संख्या पुन्हा ७८ वर आली आहे. महापालिका क्षेत्रात एकूण प्रभाग २० असणार आहेत. त्यातील चार सदस्यीय प्रभागांची संख्या १८, तर तीन सदस्यीय प्रभागांची संख्या दोन आहे. यात प्रभाग क्रमांक ९ आणि २० हे प्रभाग दोन सदस्यीय आहेत.

यंदा जाहीर केलेली प्रारूप प्रभाग रचना ही २०१७ च्या प्रभाग रचनेशी साम्य असलेली असल्याचे बोलले जाते. अद्याप तरी या प्रारूप प्रभाग रचनेविरूद्ध कुणी हरकत नोंदवलेली नाही. मात्र अनेक पक्षांच्या वतीने यावर आक्षेप घेण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळते आहे. येत्या १५ सप्टेंबरपर्यंत यावर सूचना आणि हरकती सादर करता येणार आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे.

सर्वात मोठा प्रभाग – ७ – लोकसंख्या २८ हजार ४०२

सर्वात लहान प्रभाग – ९ – लोकसंख्या १९ हजार ४१

सूचना व हरकती सादर करण्याची अंतिम मुदत – १५ सप्टेंबर

अनुसूचित जाती

एकूण लोकसंख्या – ८६ हजार ६८०,

सर्वाधिक लोकसंख्येचा प्रभाग ७ – ११,१९५

सर्वात कमी लोकसंख्येचा प्रभाग ६ – ५९८

अनुसूचित जमाती

एकूण लोकसंख्या – ६ हजार ५७६,

सर्वाधिक लोकसंख्येचा प्रभाग १ – ८९१

सर्वात कमी लोकसंख्येचा प्रभाग ६ – २९

२०१७ चे पक्षिय बलाबल ( जागा- ७८)

शिवसेना २५

भाजप ३२

राष्ट्रवादी काँग्रेस ०४

काँग्रेस ०१

साई ११

इतर ५