उल्हासनगर : आठ वर्षांपूर्वी सुरूवातीला राष्ट्रीय हरित लवाद आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्रदुषणकारी उल्हासनगर शहरातील जीन्स धुलाई कारखान्यांवर कारवाई करत ते बंद करण्यात आले होते. यावेळी सुमारे ५०० हून अधिक कारखाने बंद करण्यात आले होते. त्यानंतरही उल्हासनगरात छुप्या पद्धतीने जीन्स धुलाई कारखाने सुरू असल्याची बाब समोर आली असून उल्हासनगर महापालिका प्रशासनाने तीन बेकायदा जीन्स धुलाई कारखान्यांवर बंदीची कारवाई केली आहे. या कारखान्यांचा वीज पुरवठाही खंडीत करण्यात आला आहे.
उल्हासनगर शहर स्वस्त दरात जीन्स निर्माण करणारे शहर म्हणून गेल्या काही वर्षात प्रसिद्धीच्या झोतात आले होते. त्यामुळे ही मोठी बाजारपेठ बनली. येथील जीन्स कारखाने, निर्मिती आणि प्रक्रिया कारखान्यांनी हजारो कामगारांना रोजगार दिला. त्यातून कोट्यावधींची उलाढाल एकट्या उल्हासनगर शहरातून होत होती. यामुळे प्रस्थापित जीन्स कंपन्यांवरही परिणाम झाला होता. मात्र हे होत असताना जीन्स निर्मिती, रंग आणि धुलाई या प्रक्रियेत तयार होणारे सांडपाणी थेट नाल्यांच्या माध्यमातून वालधुनी नदीत सोडले जात होते. परिणामी वालधुनी नदीचे प्रदुषण वाढले. त्यामुळे ही वालधुनी नदी जवळपास मृत झाली.
याप्रकरणी पर्यावरणप्रेमी, सर्वसामान्य नागरिकांनी मोठी लढाई केली होती. वनशक्तीच्या माध्यमातून हा प्रश्न न्यायालयापर्यंत नेण्यात आला होता. त्यानंतर राष्ट्रीय हरित लवाद आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उल्हासनगर शहरातील ५०० हून अधिक जीन्स धुलाई कारखाने बंद करण्यात आले. मात्र त्यानंतरही छप्या पद्धतीने उल्हासनगर शहर आणि आसपासच्या परिसरात जीन्स धुलाई कारखाने सुरू असल्याचे समोर आले होते. अशा कारखान्यांवर कारवाई होत असल्याने हे शेजारच्या शहरांमध्ये, ग्रामीण भागात स्थलांतरीत झाले. मात्र त्यानंतर पुन्हा उल्हासनगरात छुप्या पद्धतीने जीन्स धुलाई कारखाने सुरू असल्याची बाब समोर आली आहे.
उल्हासनगर महानगरपालिका प्रभाग समिती क्रमांक चारच्या कार्यक्षेत्रात म्हात्रे कंपाऊड, खदान रोड, टँकर पाँईट जवळ ठिकाणी अनधिकृतपणे जिन्स धुलाईचे कारखाने सुरु असल्याची मिळाली होती. त्यानुसार उल्हासनगर महापालिका प्रशासनाच्या वतीने केलेल्या पाहणीत या ठिकाणी अनधिकृतपणे जीन्स धुलाईचे तीन कारखाने सुरु असल्याचे दिसून आले. जीन्स धुलाई करुन त्याचे दुषित सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता महापालिकेच्या गटारात सोडल्याचेही दिसून आले.
हे जीन्स धुलाईचे तीन कारखाने हे बेकायदेशिरपणे सुरु असल्याचे निष्पन्न झाल्याने प्रभाग समिती क्रमांक चारचे सहायक आयुक्त यांनी तात्काळ पंचनामा करुन तात्काळ सिलबंद करण्यात आले आहेत. तसेच महावितरणच्या अभियंत्यांनी तात्काळ या ठिकाणी येऊन कारखान्यांचा विद्युत पुरवठा खंडित करुन मीटर जप्त करण्याची कार्यवाही केली आहे.