उल्हासनगरः काँग्रेसच्या प्रदेश महिला उपाध्यक्ष आणि माजी उपमहापौर जया साधवानी यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. उल्हासनगर शहरात शिवसेनेत मराठी चेहरे ही ओळख असताना सिंधी भाषिकांची मते मिळवण्यासाठी साधवानी यांचा शिवसेनेला फायदा होईल असे बोलले जाते. त्यामुळे महापालिका निडणुकांच्या तोंडावर हा प्रवेश महत्वाचा मानला जातो.
उल्हासनगर शहरात एकेकाळी कॉंग्रेसचे वर्चस्व होते. पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचा काळ उल्हासनगरात आला. नंतर शिवसेनेने काही वर्ष पालिकेवर सत्ता गाजवली. पुढे भाजपच्या राजकारणाने येथील समीकरणे बदलली. या काळात कॉंग्रेसचा जणाधार हळूहळू कमी होत गेला. मध्यंतरीच्या काळात कॉंग्रेसच्या काही प्रमुख चेहऱ्यांनी सुरेश उर्फ पप्पू कलानी यांच्या मागे उभे राहण्याचा निर्णय घेतला. तर कॉंग्रेस फक्त शहरात काही कुटुंबापुरता मर्यादीत राहिला. मात्र तरीही येथे कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांच्या पाठिशी उभे राहण्याचे काम पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केले.
तरीही काँग्रेसची गळती रोखण्यात ज्येष्ठांना यश आलेले नाही. नुकतीच स्थानिक काँग्रेस नेत्या जया साधवानी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुक्तागिरी येथे आयोजित छोटेखानी कार्यक्रमात जया साधवानी यांनी अधिकृतरित्या शिवसेनेचा भगवा स्वीकारला. यावेळी कॉंग्रेसचे स्थानिक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
जया साधवानी हा उल्हासनगरातील चेहरा म्हणून एकेकाळी परिचीत होत्या. १९९१ साली उल्हासनगर नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी विजय मिळवला. त्यानंतर १९९७ मध्ये महापालिका स्थापन झाल्यानंतर पुन्हा त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या. विशेष म्हणजे २००३ साली केवळ ७ नगरसेवक असतानाही राकीय खेळीने महापौर आणि उपमहापौर पद काँग्रेसने मिळवले होते. त्या वेळी मालती करोतिया महापौर तर जया साधवानी उपमहापौर बनल्या होत्या.
गळतीचे कारण काय
गेल्या काही काळात काँग्रेसमधील गटबाजी दिसून आली. शहरात निर्णयक्षम नेतृत्व नसल्याची ओरड होत होती.त्यात स्थानिक पातळीवरील वाढती नाराजी यामुळे साधवानी यांच्यासारख्या ज्येष्ठ पदाधिकारी पक्षापासून लांब गेल्याची चर्चा रंगली होती. या प्रवेशामुळे उल्हासनगरात काँग्रेसची स्थिती आणखी दयनीय होण्याची चर्चा आहे. येत्या पालिका निवडणुकीत काँग्रेसला याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होते आहे.