डोंबिवली – मागील काही दिवसांपासून डोंबिवली पूर्वेतील विविध भागात संध्याकाळी, रात्री उशिरा अचानक वीज पुरवठा खंडित होत आहे. वीज भारनियमनाची महावितरणकडून कोणतीही पूर्वसूचना नसताना रात्रीच्या वेळेत अचानक वीज पुरवठा बंद होत असल्याने अगोदरच दिवसाच्या उकाड्याने हैराण नागरिकांची रात्रीच्या वेळेत तलखी होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवली पूर्व भागात रात्रीच्या वेळेत वीज जाण्याचा प्रकार नेहमीचा झाला आहे, असे सावरकर रस्ता, टिळकनगर, मानपाडा रस्ता, सुनीलनगर भागातील रहिवाशांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून उन्हाच्या कडाक्याने रहिवासी हैराण आहेत. अशा परिस्थितीत वीज भारनियमन करू नका, अशा सूचना राज्य सरकारने महावितरणला केल्या आहेत. अशा परिस्थितीत वीज पुरवठा खंडित होत असल्याने डोंबिवलीतील वीज पुरवठ्याकडे महावितरणच्या वरिष्ठांनी लक्ष घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

हेही वाचा – ‘सीआयएससी’ निकालात मुंबई-ठाण्याची बाजी, प्रथम क्रमांक मिळवणाऱ्यांत तीन मुलींचा समावेश 

संध्याकाळी सात वाजले की वीज पुरवठा बंद होतो. हा वीज पुरवठा पूर्ववत होण्यास अर्धा ते पाऊण तास लागतो. वीज केव्हा येणार यासाठी नागरिक महावितरणच्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू लागले की तेथील क्रमांक व्यस्त राहतो. त्यामुळे वीज कधी येणार याची कोणतीही माहिती नागरिकांना मिळत नाही. घरातील पंख्याची हवा गरम लागत असल्याने उष्णतेमुळे हैराण बहुतांशी नागरिकांनी घरांमध्ये वातानुकूलित यंत्रणा बसून घेतली आहे. वीज पुरवठा खंडित झाला की नागरिकांना घराच्या गच्चीत किंवा सज्जात गारव्यासाठी उभे राहावे लागते. रात्रीच्या वेळेत घराच्या खिडक्या गारव्यासाठी उघडल्या की डास घरात येतात.

काही घरांमध्ये आजारी ज्येष्ठ, वृद्ध बिछान्याला खिळून असतात. लहान मुले असतात. वीज गेल्यावर त्यांची सर्वाधिक चिडचिड होते. या अघोषित वीज भारनियमनाविषयी डोंबिवलीतील नागरिकांनी समाजमाध्यमातून टीका केली आहे. २७ गाव ग्रामीण भागात हा प्रकार दिवसाही सुरू असतो. २७ गाव भागात अनेक महाविद्यालये आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या आता परीक्षा सुरू आहेत. वर्गात उत्तरपत्रिका सोडवित असताना अचानक वीज पुरवठा खंडित होतो. त्यामुळे घामाघूम होऊन उत्तरपत्रिका सोडवावी लागते, असे सोनारपाडा भागातील महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी सांगितले.

हेही वाचा – जितेंद्र आव्हाड यांचे स्वीय सहाय्यक तडीपार

महावितरणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, वीज भारनियमन सध्या कोठेही केले जात नाही. डोंबिवली शहरातही भारनियमन केले जात नाही. काही तांत्रिक बिघाडामुळे काही वेळ वीज पुरवठा खंडित झाला तरी तात्काळ तो पुरवठा पूर्ववत करण्याच्या कर्मचाऱ्यांच्या सूचना आहेत. तांत्रिक कारणामुळे वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unannounced power load shedding during night hours in various parts of dombivli city ssb
First published on: 15-05-2023 at 13:26 IST