अंबरनाथ : अंबरनाथच्या पंचायत समिती शिक्षण विभागाने तालुक्यातील परवानगी नसलेल्या अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. या यादीत सहा शाळांचा समावेश आहे. वर्ग भरवण्याकरता कोणताही शासनाची मान्यता मिळाली नसल्याने या शाळांना अनधिकृत म्हणून घोषीत करण्यात आले आहे. या शाळांमध्ये कोणत्याही वर्गासाठी पालकांनी आपल्या पाल्यांसाठी प्रवेश घेऊ नये असे आवाहनही शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

परवानगी नसलेल्या शाळांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढत असल्याची बाब समोर आली आहे. एकीकडे पालक आपल्या पाल्यांसाठी घराजवळच्या खासगी शाळांना प्रवेशासाठी प्राधान्य देतात. मात्र नव्याने सुरू करण्यात आलेल्या काही शाळांना शासनाची परवानगी नसल्याचीच बाब समोर आली आहे. अशा तीन वेगवेगळ्या शाळांवर अंबरनाथ पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे तक्रार देत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्याचवेळी शिक्षण विभागाने अंबरनाथ तालुक्यातील काही शाळांना परवानगी नसल्याने शाळा सुरू ठेऊ नये अशा नोटीसाही बजावल्या होत्या. मात्र या नोटीसींनंतरही काही शाळा सुरूच ठेवल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे अंबरनाथच्या शिक्षण विभागाने तालुक्यातील या शाळांवर गुन्हा दाखल करण्याचे सत्र सुरू केले होते. मात्र आता प्रवेशाची लगबग सुरू असताना अशा अनधिकृत शाळांची यादी जाहीर करावी, असे वृत्त लोकसत्ता ठाणेमध्ये प्रकाशित करण्यात आले होते.

अखेर अंबरनाथ पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने अधिकृत जाहीर प्रगटन करण्यात आले आहे. शिक्षण विभाग पंचायत समिती, अंबरनाथ अंतर्गत येणाऱ्या सहा शाळांना वर्ग भरविण्याकरीता शासनाची मान्यता मिळाली नाही. त्यामुळे या शाळांना शासनातर्फे अनाधिकृत घोषित करण्यात आले आहे. खालील शाळा अनाधिकृतपणे चालविल्या जात असल्याने अशा शाळांमध्ये कोणत्याही वर्गासाठी पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश घेवू नये, असे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

शिक्षण अधिकारी विशाल पोटेकर यांनी लोकसत्ताशी बोलताना याबाबत माहिती दिली. हे जाहीर प्रगटन मुलांचे भविष्य आणि शैक्षणिक विकास यादृष्टीने जनजागृती करणेकरीता करण्यात आले आहे. जाहीर प्रगटन केल्यानंतरही पालकांनी त्यांच्या पाल्यांचे या शाळेत प्रवेश घेतल्यास त्यांच्या पाल्यांना यापुढे भविष्यात येणाऱ्या अडचणींसाठी हे कार्यालय जबाबदार राहणार नाही यादी कृपया नोंद घ्यावी, असेही पोटेकर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

या शाळा अनधिकृत

अनिरूध्द हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज कात्रप पनवेल हायवे बदलापूर (पुर्व) ता. अंबरनाथ,

श्री चेतन्य टेक्नो स्कूल सर्वे नंबर ७७, आर्यन १ ठाणेकर शिरगाव बदलापूर (पुर्व) ता. अंबरनाथ

स्टार लाईट्स इंटरनॅश्नल स्कूल सोनिवली गांव, बदलापुर (प)

नेसम इंग्निश मिडीयम स्कूल, कुडसावरे गांव वांगणी (प) ता. अंबरनाथ

रुद्र इंटरनॅशनल स्कूल, डोणे, वांगणी (प) ता. अंबरनाथ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवजीवन इंटरनॅश्नल स्कूल, वांगणी (प.)