ठाणे : राज्य शासनाच्या ‘एक राज्य एक गणवेश’ योजनेअंतर्गत मागील वर्षी महिला बचत गटांच्या माध्यमातून शालेय गणवेश तयार करण्यात आले होते. ठाणे जिल्ह्यात सुमारे एक लाख विद्यार्थ्यांसाठी बचत गटांनी गणवेश तयार केले होते. मात्र काही महिन्यांपूर्वी या योजनेचा गाशा गुंडाळल्याने यंदा बचत गटांना मोठ्या प्रमाणात गणवेश शिवण्याचे काम मिळण्याचे चित्र धूसर झाले आहे. येत्या दोन आठवड्यात सर्वत्र शाळा सुरु होतील मात्र अद्याप जिल्ह्यातील एकही बचत गटाला गणवेश शिवण्याचे काम मिळाले नाही. यामुळे महिला बचत गटांना यंदा गणवेश शिवणकामातून मिळणाऱ्या आर्थिक फायद्याला मुकावे लागू शकते.

मागील वर्षी सरकारने ‘एक राज्य, एक गणवेश’ संकल्पनेनुसार, विद्यार्थ्यांना एकसमान दोन गणवेश देण्याचे ठरविण्यात आले होते. तर गणवेशासाठीचे कापड सरकारच शाळा व्यवस्थापन समितीला उपलब्ध करून देणार होते. तर, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या नोंदणीकृत महिला बचत गटांकडून अथवा स्थानिक शिवणकाम करणाऱ्या गरजू व्यक्ती अथवा समूह यांच्या माध्यमातून हे गणवेश शिवून घेण्यात येणार होते. यानुसार ठाणे जिल्ह्यात गतवर्षी सर्व प्रक्रिया सुरळीत चालली.

जिल्ह्यातील बचत गटांना सुमारे १ लाख गणवेश शिवण्याचे थेट काम मिळाले. यामुळे त्यांचे मोठे अर्थार्जन झाले होते. मात्र राज्यात विविध ठिकाणी शाळा सुरू होऊन देखील तीन ते चार महिने उलटूनही अनेक विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नव्हते. तर अनेक शाळांकडून कपड्याबाबत तक्रार देखील करण्यात आली होती. यानंतर शासनाने यातून काढता पाय घेत गणवेशाचा रंग आणि रचना निश्चित करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला देण्याचा निर्णय सरकारने घेतला. तर यामध्ये गणवेश शिवून घेण्याबाबतही अधिकार शाळाव्यवस्थापनाला देण्यात आले आहेत.

येत्या दोन आठवड्यात सर्वत्र शाळा सुरु होतील. मात्र अद्याप जिल्ह्यातील एकही बचत गटाला शालेय गणवेश शिवण्याचे काम मिळाले नाही. यामुळे येत्या कालावधीत या बचत गटांना शाळांनी गणवेश शिवण्याचे काम दिले तरी विद्यार्थ्यांना मात्र गणवेश मिळण्यास विलंब होणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे.

राज्यातील महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध व्यवसायांच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्धी करून देण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यात दहा हजार महिला बचत गट सध्या सक्रिय असून १ लाखांहून अधिक महिला बचत गटांशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामार्फत विविध व्यवसाय केले जात आहेत. बचत गटांना अधिक सक्षम करण्यासाठी गतवर्षी शालेय गणवेश शिवण्याचे काम या गटांना देण्यात आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शालेय गणवेशासाठी समग्र शिक्षांतर्गत केंद्र सरकारने निश्चित केलेली गणवेशाची रक्कम शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. शालेय गणवेश शिवण्यासाठी कोणाकडे द्यायचे त्याचे अधिकारी शाळा व्यवस्थापानाकडे आहेत.बाळासाहेब राक्षे, प्राथमिक शिक्षणाधिकारी