scorecardresearch

कल्याण जनता बँकेच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन

कल्याण येथील कल्याण जनता सहकारी बँकेच्या स्थापनेला ५० वर्ष पूर्ण झाली आहेत.

कल्याण जनता बँकेच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन
(कल्याण जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सचीन आंबेकर, उपाध्यक्ष डाॅ. रत्नाकर फाटक, मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल खिरवडकर.)

कल्याण येथील कल्याण जनता सहकारी बँकेच्या स्थापनेला ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. सहकार क्षेत्रातील अग्रणी असलेल्या ग्राहकाभिमुख बँकेला ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बँकेतर्फे सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे २३ डिसेंबर रोजी आयोजन केले आहे. या सोहळ्याचे उद्घाटन केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती कल्याण जनता बँकेचे अध्यक्ष सचीन आंबेकर यांनी दिली.

हेही वाचा >>>ठाणे: पोलीस ठाण्यात विषारी सापाची एंट्री; कर्मचाऱ्यांची उडाली तारांबळ

आचार्य अत्रे रंगमंदिरात सकाळी ११ वाजता सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे आयोजन बँकेतर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांताचे प्रांत संघचालक डाॅ. सतीश मोढ, केंद्रीय पंचाय राज राज्यमंत्री कपील पाटील, खा. डाॅ. श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार आहेत. सुवण महोत्सवी उपक्रमाची माहिती अध्यक्ष आंबेकर यांनी दिली. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष डाॅ. रत्नाकार फाटक, मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल खिरवाडकर उपस्थित होते.

कल्याण शहरात ग्राहक सेवा देणारी कल्याण पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक आर्थिक दिवाळखोरीत निघाली. कल्याण मध्ये बँकेची गरज जाणवू लागली या विचारातून सहकारी क्षेत्रातील तज्ज्ञ दिवंगत माधवराव गोडबोले यांच्या प्रेरणेतून कल्याण जनता सहकारी बँकेची २३ डिसेंबर १९७३ रोजी स्थापना करण्यात आली. कल्याण पश्चिमेतील टिळक चौकातील देवधर सदन येथे १८० चौरस फुटाच्या जागेत बँकेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. ११ सदस्य, ५० हजार भागभांडवल आणि ८० हजार रुपयांच्या ठेवीतून बँकेचा गाडा सुरू झाला. उत्तम ग्राहक सेवा देत, उत्तम आर्थिक स्थिती सांभाळत बँकेने ५० व्या वर्षात पदार्पण केले आहे, अशी माहिती अध्यक्ष आंबेकर यांनी दिली.

हेही वाचा >>>ठाण्यात भाजपा कार्यकर्त्यांकडून पाकिस्तानच्या ध्वजाचे दहन

कल्याण जनता बहुराज्यीय बँक आहे. बँकेच्या ४३ शाखा आहेत. गुजरातमधील सुरत येथे नुकतीच बँकेची शाखा सुरू करण्यात आली. बँकेचा व्यवसाय पाच हजार कोटीचा आहे. ६० हजार सभासद आहेत. तीन लाखाहून अधिक ग्राहक आहेत. स्थापनेपासून बँकेला लेखापरिक्षणात सतत अ वर्ग दर्जा आहे. बँक प्रत्येक ताळेबंदात नफ्यात असते, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल खिरवडकर यांनी दिली.येत्या आर्थिक वर्षात महाराष्ट्राच्या विविध भागासह गुजरातमध्ये अधिक शाखा सुरू करण्याचा बँकेचा मानस आहे. बँकेतर्फे इतर सहकारी बँकांना सहकार्य दिले जाते. बँकेच्या नफ्यातील एक टक्के निधी दरवर्षी धर्मदाय निधीसाठी काढून या निधीतून पर्यावरण संवर्धन, शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबविले जातात. करोना महासाथीच्या काळात डबघाईला आलेल्या अनेक उद्योग, व्यावसायिकांना बँकेने कर्जरुपाने आधार देऊन त्यांचे व्यवसाय पूर्ववत सुरू करण्यास हातभार लावला, असे अध्यक्ष आंबेकर यांनी सांगितले.

उत्तम ग्राहक सेवा, उत्तम आर्थिक स्थितीबद्दल बँकेला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. घर बसल्या ग्राहक सेवेच्या सर्व सुविधा ग्राहकांना ऑनलाईन माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. बँकेच्या स्थापनेपासून एकही संचालक सभा भत्ता घेत नाही. हा भत्ता संचालक समाजसेवा पुरस्कार निधीत जमा केला जातो. या न्यास निधीतून गरजूंना साहाय्य केले जाते. कोकण विभागातील नागरी सहकारी बँकांच्या गटात राज्य सरकारचा सहकार भूषण पुरस्कार बँकेला मिळाला आहे. ही बँकेच्या निस्वार्थी कामाची पावती आहे, असे अध्यक्ष आंबेकर यांनी सांगितले.बँकेचे संचालक या बँकेतून कर्ज घेत नाहीत. कोणासही जामीन राहत नाहीत. या नियमाचे काटेकोरपणे पालन केले जाते, असे संचालकांनी सांगितले.

हेही वाचा >>>ढकलगाडी प्रमाणे चालणाऱ्या शिक्षण पद्धतीत बदल होणे गरजेचं; अणुशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर

“ सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून विविध योजना, ग्राहक सेवेचे उत्तमोत्तम उपक्रम सुरू करायचे आहेत. या टप्प्यानंतर पुढील टप्पे बँक उत्तम ग्राहक सेवा देत यशस्वी वाटचाल करणार आहे.”-सचीन आंबेकर,अध्यक्ष कल्याण जनता सहकारी बँक.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-12-2022 at 14:31 IST

संबंधित बातम्या