बदलापूरः कोरोना आपत्तीच्या काळात अनेक अडचणींमुळे विकासकामांवर खर्च न झालेला कोटी २१ लाख रुपयांचा निधी मुरबाडमधील २० ग्रामपंचायतींना राज्य सरकारकडून परत मिळाला आहे. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या निर्देशानंतर, राज्य सरकारच्या वित्त व नियोजन विभागाने कार्यवाही करुन शासन निर्णय जाहीर केला. याबद्दल मुरबाडमधील २० गावांच्या सरपंचांकडून राज्य शासन आणि मंत्री कपिल पाटील यांचे आभार मानण्यात आले आहेत.

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०२०-२१ मध्ये जनसुविधा अंतर्गत मुरबाड तालुक्यातील ग्रामपंचायतींना निधी देण्यात आला होता. मात्र, कोरोना आपत्तीच्या काळात टाळेबंदी लागू असल्याने अनेक विकास कामांना खीळ बसली. अनेक कामांचा निधी उपलब्ध असूनही त्याचा विनियोग करता आला नाही. टाळेबंदीत मर्यादा आल्याने तालुक्यातील २० ग्रामपंचायतींना वेळेत निधी खर्च करता आला नव्हता. राज्य सरकारच्या नियमानुसार २० ग्रामपंचायतींच्या वाट्याचा १ कोटी २१ लाख रुपयांचा हा निधी मार्च अखेरीस राज्य सरकारकडे पुन्हा वर्ग झाला. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या विकासकामांवर परिणाम झाला होता. अनेक वार्षिक नियोजीत कामे ठप्प झाली होती. त्यासाठी नव्याने पुन्हा प्रक्रिया करणे वेळखाऊ ठरणार होते. त्यामुळे तालुक्यातील २० गावांच्या सरपंचांनी ही व्यथा केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे मांडली होती.

हेही वाचा >>> ठाणे: घोडबंदर भागात रिक्षा उलटून लागलेल्या आगीत महिलेचा मृत्यू

तसेच राज्य सरकारकडे परत गेलेला निधी परत मिळवून देण्याची विनंती केली होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून राज्य सरकारच्या वित्त व नियोजन विभागाकडे याबाबत मागणी केली होती. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चाही करण्यात आली होती. अखेर या प्रयत्नांना यश आले. राज्य सरकारच्या नियोजन विभागाने मंगळवारी काल शासन निर्णयाद्वारे २०२०-२१ मधील अखर्चित १ कोटी २१ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यास मान्यता दिली. तसेच २०२३-२४ मधील विकासकामांसाठी हा निधी उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निर्णयामुळे २० ग्रामपंचायतींना दिलासा मिळाला आहे. त्यांना या निधीतून कामे हाती घेता येतील.

हेही वाचा >>>Video : उल्हासनगरचे शासकीय मध्यवर्ती रुग्णालय अंधारात; आठ तासानंतर वीज पुरवठा सुरू, तांत्रिक गोंधळात रुग्णांचे हाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुर्गम भागातील ग्रामपंचायतींना दिलासा

मुरबाड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींचे उत्पन्न तुटपुंजे आहे. कोरोना काळात अनेक अडचणींमुळे आम्हाला हा निधी खर्च करता आला नव्हता. त्यासाठी आम्ही वर्षभरापासून प्रयत्न करीत होते. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची भेट घेतल्यावर त्यांनी तातडीने मंत्रालयात संपर्क साधला. त्यानंतर वेगाने सूत्रे हलल्यावर आम्हाला आमच्या हक्काचा निधी परत मिळाला आहे, याचा आनंद वाटतो. कपिल पाटील यांच्यामुळेच हे साध्य झाले, अशी प्रतिक्रिया डेहनोलीचे सरपंच सतीश केंबारी यांनी व्यक्त केली.